Pune Festival | ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे यांचा १५ सप्टेंबरला पुणे फेस्टिव्हलतर्फे विशेष सत्कार
पुणे : Pune Festival | प्रख्यात मराठी सुगम संगीत गायिका अनुराधा मराठे यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल पुणे फेस्टिव्हलतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे होणार आहे.
पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते अनुराधा मराठे यांचा सत्कार केला जाणार आहे. सन्मानचिन्ह, शाल, साडी आणि श्रीफळ असे या सत्काराचे स्वरूप असेल.
या विशेष कार्यक्रमात अनुराधा मराठे यांच्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीवर आधारित प्रकट मुलाखतीचेही आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ निवेदिका मंजिरी धामणकर या अनुराधा मराठे यांच्याशी संवाद साधणार असून, त्यांच्या संगीत प्रवासातील विविध टप्पे, आठवणी आणि अनुभव या मुलाखतीतून उलगडणार आहेत.
मराठी सुगम संगीत क्षेत्रातील अनुराधा मराठे यांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी पुणे फेस्टिव्हलतर्फे हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
