Pune Crime News | हॉस्पिटलच्या ट्रस्टला 7 कोटींचा निधी मिळवून देण्याच्या नावाखाली 2 कोटींची फसवणूक; 8 जणांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | हॉस्पिटलच्या ट्रस्ट ला ७ कोटी रुपयांची देणगी मिळवून देतो, असे आमिष दाखवून त्यासाठी अगोदर पैसे भरावे लागतील, असे सांगून वेळोवेळी १ कोटी ९७ लाख ६० हजार रुपये घेऊन पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
ऋषिकेश गोसावी (रा. पुणे), गणेश अरुण ठाणगे (रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर), अभिषेक सूर्यवंशी (रा. पुणे), मोहंमद(रा. मुंबई), नीतू सिंग (रा. मुंबई), टेरेज विज (रा. बंगलोर), शेख (रा. दिल्ली) आणि एक अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना कॅम्प मधील हॉस्पिटल आणि मार्केटयार्ड येथील कार्यालयात जून ते सप्टेंबर २०२६ दरम्यान घडली आहे. याबाबत पुण्यातील ३८ वर्षांच्या प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर यांनी मार्केटयार्ड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टर हे शनिवार पेठेत राहतात. ते वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या परिचयातील एकाने त्यांच्या हॉस्पिटलच्या ट्रस्ट ला काही लोक देणगी मिळवून देतील, असे सांगितले. त्यांनी आरोपींशी ओळख करून दिली. आरोपींनी तुमच्या ट्रस्ट ला ७ कोटी रुपयांची देणगी मिळवून देऊ शकतो, असे सांगितले. त्यानंतर दिल्ली, बंगळूर येथील प्रतिनिधी येऊन पाहणी करतील, असे सांगून त्यांच्या प्रवासाची, राहण्याची व्यवस्था करण्यासाठी पैशांची मागणी केली. तसेच वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून १ कोटी ९७ लाख ६० हजार रुपये घेतले. त्यांना कोणतीही देणगी मिळवून दिली नाही. आपली फसवणूक झाली, हे लक्षात आल्यावर डॉक्टरांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक गडगडे तपास करीत आहेत.
