Pune Crime News | पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची 95 लाखांची फसवणूक करणाऱ्या अक्षय ननावरे यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीसाठी रोख रक्कमेची करत होते मागणी
पुणे : Pune Crime News | शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ९५ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी दाेघांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अक्षय दिलीप ननावरे Akshay Dilip Nanaware (वय २७, रा. ससाणेेनगर, हडपसर), दीपक सुधाकर चौधरी Deepak Sudhakar Chaudhary (वय ३३, रा. सिद्धीविनायक अक्षर विहार सोसायटी, एनडीए रस्ता, उत्तमनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका व्यावसायिकाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक तरुण हडपसर भागात राहायला आहे. आरोपींशी त्यांची ओळख झाली होती. ते हॉटेलमध्ये एकत्र भेटत असत. त्यावेळी त्यांनी फिर्यादी यांना आम्ही एक व्हॉट्सअॅप ग्रुप केला असून लोकांकडून पैसे घेऊन शेअर बाजारात गुंतवणूक करतो. त्यात चांगला परतावा देतो. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दरमहा पाच ते दहा टक्के परतावा देण्याचे आमिष आरोपींनी त्यांना दाखविले होते. त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. ग्रुपमधील लोक आपल्याला फायदा झाल्याचे सांगून स्किनशॉट टाकत होते. ते पाहून फिर्यादी यांचा विश्वास बसला.
त्यानंतर आरोपींनी व्यावसायिकाकडून १ कोटी ५ लाख रुपये रोख स्वरुपात घेतले. ऑनलाइन पद्धतीने १९ लाख रुपये घेतले. आरोपींनी व्यावसायिकाला २५ लाख रुपये परत दिले. त्यातील साडे चार लाख नफा मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर परतावा तसेच मुद्दल परत केले नाही. त्यानंतर त्यांनी आता ९५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पंकज खोपडे यांनी तपास करत आहेत.
याबाबत तपास अधिकारी पंकज खोपडे यांनी सांगितले की, अक्षय ननावरे हा सध्या परदेशात गेला आहे. त्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुप केला होता. त्यामुळे आणखी काही जणांची फसवणूक झाली असल्याची शक्यता आहे. दीपक चौधरी याला चौकशीला बोलावले आहे.
