Pune Crime News | ससून रुग्णालयात क्लार्कच्या नोकरीच्या आमिषाने 9 लाखांची फसवणूक; ससून रुग्णालयातील महिलेच्या पतीला अटक
पुणे : Pune Crime News | ससून रुग्णालयात शिपाई, क्लार्क पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने ४ तरुणाची ९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बंडगार्डन पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पतीला अटक केली आहे.
याबाबत एका तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. श्याम अशोक खैरे Shyam Ashok Khaire (३६) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. दीपाली शाम खैरे (दोघे रा. ससून क्वार्टर, सोमवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण लष्कर भागातील दस्तूर शाळेजवळ राहायला आहे. आरोपी दाम्पत्याशी त्याची गेल्या वर्षी ओळख झाली होती. दीपाली खैरे या ससून रुग्णालयात क्लार्क आहेत. त्यांनी व श्याम खैरे यांनी तरुणाला ससून रुग्णालयात शिपाई पदावर कायमस्वरुपी नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. तसेच आणखी ३ तरुणांना क्लार्क पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून प्रत्येकी दोन लाख रुपये घेतले. तरुणाने नोकरीबाबत आरोपी दाम्पत्याकडे विचारणा केली. तेव्हा दाम्पत्याने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.
पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास यांनी सांगितले की, पोलिसांकडे आतापर्यंत चार जणांच्या तक्रारी आल्या असून त्यांची ९ लाखांची फसवणूक झाली आहे. पतीला अटक करण्यात आली आहे.
