Pune PMC News | गणेशोत्सव मिरवणुकीच्या वेळी आरोग्य कक्ष आणि हिरकणी कक्ष उभारणीची निविदा रद्द ! चार स्वतंत्र निविदा ऐवजी एकच निविदा काढण्याचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांचे आदेश

Pune PMC News

प्रभाग समिती पातळीवर एक कोटी रुपयांच्या निधीचा कार्यक्रम ‘सजग नागरीक’ मुळे उधळला

पुणे : Pune PMC News | गणेशोत्सव मुख्य मिरवणुकीच्यावेळी आरोग्य कक्ष आणि हिरकणी कक्षासह अन्य सुरक्षिततेच्या उपाययोजनांसाठी महापालिकेच्या झोन ५ च्यावतीने तुकड्यांमध्ये काढलेल्या चार निविदा रद्द कराव्यात. या कामासाठी एकच निविदा काढावी, असे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालयाला दिले आहेत. अतिरिक्त आयुक्तांच्या या निर्णयामुळे झोन ५ च्या अधिकार्‍यांनी एकाच स्वरूपाच्या आणि एकाच प्रभागातील कामासाठी २१ लाख रुपयांच्या चार स्वतंत्र निविदा काढून ‘ प्रभाग समिती’ पातळीवरच सुमारे एक कोटी रुपयांचा ‘ कार्यक्रम ’ करण्याचे निश्‍चित केल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

गणेशोत्सव मिरवणुकीच्यावेळी आरोग्य कक्ष, हिरकणी कक्षासाठी स्वागत मंडप उभारणे, बॅरीकेडींग करणे या कामासाठी झोन क्र. ५ च्या विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालयाच्यावतीने प्रत्येकी २१ लाख १८ हजार रुपये खर्चाच्या चार स्वतंत्र निविदा काढल्या. यासाठी महापौर निधीतून विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालयाच्या प्रभाग क्र. २५ मधील चारही नगरसेवकांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे लॉकींग करून देण्यात आले आहे. मुख्य मिरवणूक मार्गतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या पश्‍चिमेकडील भाग हा प्रभाग क्र. २५ मध्ये येतो. वास्तविक महापौर निधितूनच मिरवणुकीतील वरील कक्ष, बॅरीकेडींगच्या खर्चासाठी दिलेल्या एक कोटी रुपयांतून एकच निविदा राबविणे शक्य होते. या निविदेला स्थायी समितीची मान्यता घेता आली असती.

परंतू २५ लाख रुपयांपर्यंतच्या निविदांच्या मंजुरीचे अधिकार प्रभाग समित्यांना देण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर एक कोटी रुपयांचे चार समान भाग करून २१ लाख २८ हजार रुपयांच्या चार स्वतंत्र निविदा राबविण्यात आल्याने अधिकच संशय बळावला. मिरवणूक मार्गावर महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांच्या इमरती, दवाखाने आहेत. तसेच अनेक जुन्या शिक्षण सस्था आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या १५ सुसज्ज रुग्णवाहीका, ३ आयसीयू बेडची सुविधा असलेली सुविधा देखिल उपलब्ध करून देण्यात येते. प्रशासनाने आतापर्यंत गणेशोत्सव मिरवणुकीच्यावेळी हिरकणी कक्ष उभारलेले नाहीत. ही सुविधाच द्यायची झाल्यास महापालिकेची कार्यालये, शाळा, महाविद्यालयांच्या वर्गखोल्यांमध्ये करणे सहज शक्य आहे. असे असताना प्रशासनाने तुकड्यांमध्ये आणि अनावश्यक कामांसाठी काढलेल्या निविदेचा फेरविचार करावा, अशी मागणी केल्याचे वृत्त आज प्रसिद्ध झाले.

यासंदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी एकाच प्रभागात एकसारख्या कामासाठी चार स्वतंत्र निविदा काढणे चुकीचे असल्याचे मान्य केले. विश्रामबाग क्षेत्रिय आयुक्तांना ही निविदा रद्द करून या कामासाठी तातडीने एकच निविदा काढण्याचे आदेश दिल्याचे नायर यांनी सांगितले.

महापालिकेच्या झोन ५ मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीच्यावेळी खाजगी संस्थेच्या मदतीने स्वागत कक्ष तसेच पोलिस कक्ष उभारण्यात येतात. असे असताना याच कामासाठी महापौर निधीतून चार नगरसेवकांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देउन चार स्वतंत्र निविदा काढण्याच्या उद्देशाबाबत राजकिय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

You may have missed