Pune Festival | पुणे फेस्टिव्हल 2026 : ‘38 हा केवळ आकडा नाही, तर पुण्याची सांस्कृतिक परंपरा’ – अध्यक्ष कृष्णकुमार गोयल

Pune Festival | Pune Festival 2026: ‘38 is not just a number, but Pune's cultural tradition’ - President Krishnakumar Goyal

पुणे : Pune Festival | पुणे फेस्टिव्हलची ३८ वर्षांची वाटचाल ही केवळ एका आकड्याची नोंद नसून पुण्याची सांस्कृतिक परंपरा समृद्ध करणारा सातत्यपूर्ण प्रवास आहे, असे पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले.

गोयल म्हणाले, “कोणताही उत्सव आपोआप लोकोत्सव होत नाही. त्यामागे कार्यकर्त्यांची मोठी फळी आणि सातत्याने काम करणारे असंख्य हात असतात. सुरेश कलमाडी यांनी या उत्सवाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. पुणे फेस्टिव्हलने नेहमीच पक्षविरहित भूमिका कायम ठेवली असून पुणेकरांनी या उत्सवाला मोठा प्रतिसाद दिला आहे. आज पुणे फेस्टिव्हलचा ब्रँड जगभर पोहोचला असून विविध देशांतील नागरिकही या उत्सवात सहभागी होत आहेत.”

यंदाच्या पुणे फेस्टिव्हलमध्ये येरवडा कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच नेत्रदानाविषयी जनजागृतीवरही विशेष भर देण्यात आला आहे.

यावर्षीपासून ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. कला आणि कलाकारांचे महत्त्व अधोरेखित करताना गोयल म्हणाले की, कलाकार केवळ समाजाचे मनोरंजन करत नाहीत, तर आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करतात आणि प्रत्येकाला स्वतःकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा देतात.

यंदाच्या पुणे फेस्टिव्हलमध्ये ५० हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हे सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य असल्याचे आयोजकांनी सांगितले.

३८ व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन शुक्रवारी स्वारगेट येथील श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले.

या सोहळ्याला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पुणे फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पुणे फेस्टिव्हलच्या संरक्षक अभिनेत्री व नृत्यांगना खासदार हेमा मालिनी, खासदार मेधा कुलकर्णी, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पुणे फेस्टिव्हलच्या अध्यक्षा मीरा कलमाडी, अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, डॉ. सतीश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

You may have missed