Pune Accident News | पुणे : नवले पुलाजवळ भीषण अपघात; भरधाव कंटेनरच्या धडकेत 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, सहा जण जखमी
पुणे : Pune Accident News | मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरने काँक्रीट पंप वाहून नेणाऱ्या टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने 22 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले असून, कंटेनरने एकापाठोपाठ इतर वाहनांनाही धडक दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संदीप जगन्नाथ कुमार (वय 22, रा. नरहटी, जि. सोनभद्र, उत्तर प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कंटेनर चालक धनराज गणपतलाल वैष्णव (वय 24, सध्या रा. रामसर, जि. अजमेर, राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून नऱ्हे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर चालकाचे नवले पुलाजवळ नियंत्रण सुटले. यावेळी कंटेनरने पुढे जाणाऱ्या काँक्रीट पंप वाहून नेणाऱ्या टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता इतकी होती की टेम्पोच्या मागील भागाचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. टेम्पोमध्ये असलेला कामगार संदीप कुमार गंभीर जखमी झाला. त्यानंतर कंटेनरने एका मोटारीसह ट्रकलाही धडक दिली. या अपघातात टेम्पोमधील दोन कामगारांसह एकूण सहा जण जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभाग आणि नऱ्हे पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच संदीप कुमार याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अपघातात कंटेनर चालक धनराज वैष्णव हाही जखमी झाला. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अपघातानंतर वाहतूक विस्कळीत
या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
