Pune Pimpri Crime News | पुणे : पत्नीचा धारदार शस्त्राने खून करून पतीची गॅलरीतून उडी; देहूगाव येथील घटना

Pune Pimpri Crime News | Pune: Husband jumps from gallery after wife kills him with a sharp weapon; incident in Dehugaon

पुणे/पिंपरी : Pune Pimpri Crime News |  कौटुंबिक वादातून पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिचा खून केल्याची घटना देहूगाव येथील ओमकार हाउसिंग सोसायटीत रविवारी पहाटे घडली. त्यानंतर पतीने स्वतःवरही वार करून दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी मारल्याचा पोलिसांना संशय आहे.

मृत महिलेचे नाव शुभांगी आकाश बारस्कर (वय 28) असे आहे. तिचा पती आकाश रामदास बारस्कर (वय 26) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आकाश एका आयटी कंपनीत काम करत असल्याची माहिती आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे सहाच्या सुमारास गस्तीवरील पोलिसांना देहूगावातील ओमकार सोसायटी परिसरात एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली.

पोलिस घटनास्थळी पोहोचले असता, घरमालक प्रकाश रामचंद्र राऊत यांच्याकडे भाड्याने राहणारा आकाश बारस्कर रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याची पत्नी शुभांगी दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळली.

पोलिसांनी दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी शुभांगीला मृत घोषित केले. आकाशवर उपचार सुरू आहेत.

आकाश आणि शुभांगी यांचा डिसेंबर 2023 मध्ये विवाह झाला होता. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून ते ओमकार सोसायटीत भाड्याने राहत होते.

प्राथमिक चौकशीत गेल्या सुमारे एक वर्षापासून दोघांमध्ये वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. याच वादातून आकाशने शुभांगीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. त्यानंतर त्याने स्वतःवरही वार करून दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी मारल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. देहूरोड पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.