Neharu Road Flyover Bridge Pune | नेहरू रस्त्यावरील प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम लवकर सुरू करण्याची मागणी

Nehru Road Flyover Bridge Pune | Demand to start work on the proposed flyover soon

पुणे : Neharu Road Flyover Bridge Pune | मार्केट यार्ड परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता नेहरू रस्त्यावर वखार महामंडळ चौक ते गंगाधाम चौक आणि पुढे आईमाता मंदिरापर्यंत प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम लवकर सुरू करावे, अशी मागणी दि पूना मर्चंट्स चेंबरने केली आहे.

यासंदर्भात नगरविकास राज्यमंत्री तथा पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले आहे.

मार्केट यार्ड परिसरातील लोकसंख्या आणि वाहनांची संख्या सातत्याने वाढत असल्याने नेहरू रस्त्यावरील वाहतूक कोंडी गंभीर बनत असल्याचे चेंबरने निवेदनात नमूद केले आहे. पूर्वी मार्केट यार्डमध्ये 10 ते 12 टन क्षमतेचे ट्रक येत होते. आता 30 टन क्षमतेचे मोठे ट्रक बाजारात येत असून त्यांची रुंदीही अधिक आहे. दुकानांसमोर माल उतरविण्यासाठी ही वाहने उभी राहत असल्याने रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

कात्रज-कोंढव्यातील वाढत्या वसाहतींमुळे वाहनसंख्येत वाढ

कात्रज-कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणावर नवीन गृहसंकुले विकसित झाल्याने या भागातून मार्केट यार्डकडे येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. परिणामी, नेहरू रस्ता आणि लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून उड्डाणपुलाचे नियोजन तातडीने करावे, अशी मागणी चेंबरने केली आहे.

वखार महामंडळ चौक ते गंगाधाम चौक आणि पुढे आईमाता मंदिरापर्यंत उड्डाणपूल उभारल्यास बाजाराशी संबंधित वाहने पुलाखालून मार्केट यार्डमध्ये ये-जा करू शकतील, तर अन्य वाहने उड्डाणपुलावरून पुढे जाऊ शकतील. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल, असा चेंबरचा दावा आहे.

प्रस्तावित उड्डाणपुलाची रचना मध्यभागी एकाच खांबावर आधारित असावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

अवजड वाहनांचा विचार करून आराखडा तयार करण्याची मागणी

उड्डाणपुलाचे नियोजन करताना मार्केट यार्डमध्ये नियमितपणे येणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक लक्षात घेण्यात यावी. तसेच बाजार आवाराच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या गेटजवळ कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

प्रस्तावित उड्डाणपुलाचा आराखडा 3D स्वरूपात उपलब्ध करून दिल्यास व्यापारी, नागरिक आणि संबंधित यंत्रणांना प्रकल्पाची रचना अधिक स्पष्टपणे समजू शकेल, असे चेंबरने सुचविले आहे.

पुलाचे काम कमीत कमी कालावधीत पूर्ण करावे आणि बांधकाम सुरू असताना मार्केट यार्डमधील दैनंदिन व्यवहार तसेच वाहतूक शक्य तितकी सुरळीत राहील, यासाठी स्वतंत्र नियोजन करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

अनेक वर्षांपासून सुरू आहे पाठपुरावा

या उड्डाणपुलासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू असल्याचे चेंबरने सांगितले. नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी या प्रस्तावावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची चेंबरच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले आणि प्रस्तावित उड्डाणपुलाबाबत सविस्तर चर्चा केली.

यावेळी दि पूना मर्चंट्स चेंबरचे सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले, तसेच दिनेश मेहता, शाम लढा आणि प्रणव गुगळे उपस्थित होते.

प्रस्तावित उड्डाणपुलाबाबत बिबवेवाडी वाहतूक विभाग, पुणे शहर परिमंडळ 3 आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे यांचे अभिप्रायही निवेदनासोबत जोडण्यात आले आहेत.

या विषयावर सविस्तर चर्चा करून प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर योग्य निर्णय घेण्याबाबत महापालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती दि पूना मर्चंट्स चेंबरचे सचिव ईश्वर नहार यांनी दिली.

You may have missed