Pune Crime News | गे डेटिंग अॅपवरुन भेटायला आलेल्या तरुणाला तिघांनी मारहाण करुन लुबाडले; विश्रांतवाडी पोलिसांनी एकाला केली अटक
पुणे : Pune Crime News | गे डेटिंग अॅपवरुन तरुणाला भेटायला बोलावले. भेटायला आल्यावर त्यांना पाहून तिघांनी तरुणाला मारहाण करुन मोबाईलमधून २० हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करुन घेण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
देवेंद्र ऊर्फ करण पवनराजे Devendra, alias Karan Pawanraje (वय १९, रा. इंदिरानगर, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत भोसरी येथील एका २२ वर्षाच्या तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना येरवडा येथील मेंटल हॉस्पिटलसमोरील पडक्या वसाहतीमधील खोलीमध्ये २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसात वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गे असून गे डेटींग अॅपवरुन त्यांना एका त्यांच्याच वयाच्या मुलाने भेटण्यासाठी मेंटल हॉस्पिटल कॉर्नरवर बोलविले होते. त्यानुसार ते आळंदी रोडवरील मेंटल हॉस्पिटल कॉर्नरला भेटले. ते दोघे तेथील मेंटल हॉस्पिटल सर्वंट कॉर्टर येथे असताना त्या ठिकाणी अचानकपणे ३ तिघे जण आले. त्यांनी शिवीगाळ करुन हाताने तसेच प्लास्टिकचे पट्टीने मारहाण केली. फिर्यादी यांचा मोबाईल जबरदस्तीने घेऊन दमदाटी करुन मोबाईलमधील फोन पे चा पासवर्ड घेतला. त्यांच्या बँक खात्यातून २० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यास तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे त्यांनी दोन दिवस हा प्रकार कोणाला सांगितला नाही. शेवटी १ ऑक्टोंबर रोजी त्यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी शोध घेऊन देवेंद्र ऊर्फ करण पवन राजे याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लोहकरे तपास करीत आहेत.
