Pune Crime News | कामगाराला धमकावुन खिशातील रोकड जबरदस्तीने चोरुन नेणार्‍या रेकॉर्डवरील दोघांना बंडगार्डन पोलिसांनी केले जेरबंद

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  मध्यरात्रीच्या सुमारास पायी जात असलेल्या कामगाराला दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी धमकावुन खिशातील रोकड जबरदस्तीने चोरुन नेली होती. या दोघा सराईत गुन्हेगारांना बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले आहे.

गोपाल हिराराम घारु Gopal Hiraram Gharu (वय २२, रा. खराडी गावठाण, खराडी), नवदिप कुबेर भंडारी Navdeep Kuber Bhandari (वय १९, रा. बुवानगर, खराडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना ससून  रुग्णालयाच्या गेटजवळील पीएमपी बसस्टॉपजवळ १ ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजता घडली होती. याबाबत हरीराम चेलाराम चौधरी (वय ३९, रा. मालधक्का चौक, मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. चौधरी हे मध्यरात्री अडीच वाजता ससून रुग्णालयाजवळील पीएमपी  बसस्टॉपजवळून पायी जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरुन दोघे जण आले. चालकाने त्यांची गचंडी पकडली. पाठीमागे बसलेल्याने खिशातील पाकीट व ७ हजार रुपये रोख जबरदस्तीने चोरुन नेले.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना बंडगार्डन पोलिसांना या सराईतांची माहिती मिळाली. तसेच सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिसांनी दोघांना शोध घेऊन त्यांना अटक केली. चोरलेल्या ७ हजारांपैकी २ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. या दोघांवर खराडी, चंदननगर पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार तपास करीत आहेत.

You may have missed