Pune News | ताथवडे येथील श्री बालाजी विद्यापीठावर प्रशासक मंडळ नियुक्ती; उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्णय

mumbai high court

पुणे : Pune News |  ताथवडे येथील श्री बालाजी विद्यापीठ हे स्वयं-अर्थसहाय्यित विद्यापीठ असून; ट्रस्टमधील अंतर्गत वादामुळे दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला होता. परिणामी या प्रकरणासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

डिसेंबर २०२४ मध्ये संस्थेच्या संस्थापक अध्यक्षांच्या निधनानंतर, त्यांच्या पत्नी बी. थिलागावती यांची अध्यक्षपदी झालेली निवड कायदेशीरदृष्ट्या वादात सापडली होती. या प्रकरणात राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते.

न्यायालयाच्या निर्णयानुसार, या प्रकरणात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप केला. विद्यापीठाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी शासनाने उच्च न्यायालयात आपली बाजू प्रभावीपणे मांडली. त्यानंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणात विद्यापीठावर प्रशासक मंडळ नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.

नियुक्त प्रशासक मंडळामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर यांची मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी डॉ. चारुशीला गायके आणि सीओईपीचे अधिष्ठाता पराग सदगीर यांची प्रशासक मंडळावर नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्तीनंतर, मंडळाने तात्काळ विद्यापीठाची सूत्रे हाती घेतली. तसेच, विद्यापीठाच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थांची आंदोलनस्थळी जाऊन  संवाद साधत, त्यांच्या समस्या व प्रश्न समजून घेतले. या सकारात्मक पावलामुळे येत्या विद्यापीठाचे दैनंदिन शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज पूर्णपणे सुरळीत होईल, असा विश्वास निर्माण झाला आहे.

You may have missed