SM Joshi Bridge | एस. एम. जोशी पूल आंदोलनासाठी बंद; वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर, संदीप खर्डेकर यांची पोलिस आयुक्तांकडे खुलाशाची मागणी
पुणे : SM Joshi Bridge | गरवारे महाविद्यालयामागील एस. एम. जोशी पूल 1 ऑक्टोबरपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे हा पूल बंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी म्हटले आहे.
याबाबत खर्डेकर यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना निवेदन देत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. आंदोलनासाठी पोलिसांनी अधिकृत परवानगी दिली आहे का, अशी विचारणा त्यांनी केली आहे.
अशा प्रकारे आंदोलनासाठी पूल किंवा रस्ता अनेक दिवस बंद ठेवण्यास परवानगी दिल्यास भविष्यात इतर संघटना किंवा राजकीय पक्षांकडूनही अशाच प्रकारच्या मागण्या होऊ शकतात, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे.
सदर आंदोलन किती काळ सुरू राहणार आहे, तसेच आंदोलकांना जिल्हाधिकारी कार्यालय, विधान भवन परिसर किंवा एखाद्या मैदानासारख्या पर्यायी ठिकाणी हलवता येईल का, याबाबतही त्यांनी पोलिसांकडे स्पष्टता मागितली आहे.
कायदा आणि सुव्यवस्था राखताना सामान्य पुणेकरांच्या वाहतुकीचा प्रश्न केंद्रस्थानी ठेवून योग्य तो निर्णय घ्यावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी संदीप खर्डेकर यांनी केली आहे.
