Pune Crime News | (फुरसुंगी) पुणे : ‘तुंबडी’ उपचाराच्या नावाखाली महिलेच्या गुडघ्यातून तीन वेळा काढले रक्त; पोलिसांकडून तोतया डॉक्टर शहजाद इक्बाल मोहम्मद खानला अटक
पुणे : Pune Crime News | नॅचरोपॅथी केअरचा डॉक्टर असल्याचा दावा करुन महिलेच्या गुडघ्यावर ‘तुंबडी’ उपचार करण्याच्या नावाखाली तिच्या गुडघ्यात तीन वेळा सुई टोचून रक्त काढणाऱ्या राजस्थानच्या तोतया डॉक्टराला फुरसुंगी पोलिसांनी अटक केली आहे.
शहजाद इक्बाल मोहम्मद खान ऊर्फ राज पटेल Shahzad Iqbal Mohammad Khan alias Raj Patel (वय ४२, सध्या रा. भोसरी, मुळ रा. खटीक मोहल्ला, सांगोद, कोटा, राजस्थान) असे या तोतया डॉक्टराचे नाव आहे. याबाबत फुरसुंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. राजेश महादेव पाखरे (वय ४९) यांनी फुरसुंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना फुरसुंगी येथील भेकराईनगरमधील एस पी रेसिडेन्सी येथे रविवारी ४ ऑक्टोंबर २०२६ रोजी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज पटेल असे नाव सांगणारा एक तोतयाने ३ ऑक्टोंबर रोजी एका तरुणाला फोन केला. मी डॉक्टर आहे, तुमच्या आईचे गुडघ्याचे उपचार करावयाचे आहे, असे समजले. मी उपचार करतो, असे सांगितले. त्यावेळी त्यांनी माझ्या आईचे हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असून मला कोणत्याही प्रकारचे उपचार करावयाचे नाही, असे सांगितले. त्यानंतर दुसर्या दिवशी ४ ऑक्टोंबर रोजी त्यांच्या घरी गेला. त्याने त्यांच्या आईचे दोन्ही गुडघे चेक करुन त्यांच्या एका गुडघ्याला एका सुईने टोचवून त्यामधून रक्त काढले. ते अशुद्ध आहे, असे म्हणून तीन वेळा त्याने त्यांच्या गुडघ्यातील रक्त काढले. मी तीन वेळा अशुद्ध रक्त काढले असून प्रत्येकी ४ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये झाले आहे. हे पैसे त्याने एका स्कॅनरवर पाठविण्यास सांगितले. त्यानंतर त्याने अजून दोन ते तीन वेळा उपचार करावा लागेल, म्हणजे त्यांना आराम मिळेल, असे सांगितले.
या तरुणाला संशय आल्याने त्याने गुन्हे शाखेच्या युनिट ६ मधील पोलीस हवालदार पल्लवी मोरे यांना कळविले. युनिट ६ चे पथक तातडीने भेकराईनगर येथे गेले. त्यांनी राज पटेल नाव सांगणार्याला ताब्यात घेतले. तो डॉक्टर आहे अथवा नाही, याच्या तपासणीसाठी त्याला फुरसुंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे डॉ. पाखरे यांनी त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने राज पटेल नावाचे व्हिजिटिंग कार्ड दिले. राज पटेल याच्याकडे अॅलोपॅथी, आयुर्वेद, सिद्ध दंत चिकित्सा व होमिओपॅथी याबाबत कोणते नोंदणी प्रमाणपत्र आहे का याची चौकशी केली. तेव्हा त्याने कोणतेही प्रमाणपत्र नसल्याचे सांगितले. तुम्ही रुग्णांवर कोणत्या प्रकारचे उपचार करता, असे विचारल्यावर त्याने ‘तुंबडी’ करतो असे सांगितले. त्याला मेडिकल कॉऊंसिलची कोणत्याही प्रकारची मान्यता नाही.
राज पटेल याच्याकडील रेग्झीन बॅगची तपासणी केल्यावर बॅगमध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधे व शहजाद इक्बाल मोहम्मद खान या नावाचे आधार कार्ड सापडले. त्याबाबत चौकशी केल्यावर त्याने हेच आपले खरे नाव असून व्हिजिटिंग कार्डवर असेच राज पटेल म्हणून नाव ठेवल्याचे सांगितले. तो अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक (बोगस डॉक्टर) असल्याचे निदर्शनास आल्याने डॉ. राजेश पाखरे यांनी फिर्याद दिली आहे. फुरसुंगी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शंभूराज जाधव तपास करीत आहेत.
