Pune Crime News | पुणे : दारुच्या नशेत झालेल्या वादातून डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; उत्तमनगर पोलिसांनी एकाला केली अटक
पुणे : Pune Crime News | दारुच्या नशेत असताना एकमेकांकडे पाहण्यावरुन झालेल्या वादातून दोघांनी डिलिव्हरी बॉय तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. उत्तमनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
आदित्य गुलाब कांबळे (वय २३, रा. कोंढवे धावडे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सागर प्रदिप कोठारी Sagar Pradip Kothari (वय २२, रा. इस्कॉन मंदिराजवळ, उत्तमनगर) याला अटक केली आहे. त्याच्याबरोबरील अल्पवयीन मुलावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उत्तमनगर येथील भवानी माता मंदिराजवळ रविवारी ४ ऑक्टोंबर रोजी रात्री १० वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदित्य कांबळे हे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. ते व त्यांचे मित्र हे उत्तमनगर येथील भवानी माता मंदिराजवळील चौकात थांबले होते. यावेळी सागर कोठारी व त्यांचा अल्पवयीन साथीदार दारुच्या नशेत तेथे आले. फिर्यादी यांनी त्याच्याकडे पाहिल्यावरुन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा सागर कोठारी याने शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. त्यांच्याकडील कोयत्याने अदित्य कांबळे यांच्या डोक्यात वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. उत्तमनगर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने पोहचले. त्यांनी सागर कोठारी याला ताब्यात घेतले.
दारुच्या नशेत हा वाद झाला आहे. आदित्य कांबळे याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन सागर कोठारी याला अटक केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंग क्षीरसागर यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील तपास करीत आहेत.
