Pune Crime News | रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी वादानंतर एकाला मारहाण; महिलेसह सात जणांविरुद्ध गुन्हा
पुणे : Pune Crime News | हडपसरमधील एका रुग्णालयात बिलिंगच्या कारणावरून झालेल्या वादादरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करू नका, असे सांगणाऱ्या व्यक्तीला मारहाण केल्याची तक्रार हडपसर पोलिसांकडे करण्यात आली आहे. याप्रकरणी महिलेसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी रमीत राकेश गुप्ता (वय ३५, सध्या रा. मगरपट्टा सिटी, हडपसर, मूळ रा. सोनीपत, हरयाणा) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता यांचे नातेवाईक हडपसर परिसरातील एका रुग्णालयात उपचार घेत होते. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे सात वाजता गुप्ता आणि त्यांचे मित्र रुग्णालयाच्या बिलिंग विभागात पैसे भरण्यासाठी थांबले होते.
यावेळी एक महिला आणि तिचे नातेवाईक बिलाच्या कारणावरून बिलिंग विभागातील कर्मचाऱ्यांशी वाद घालत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, संबंधितांकडून शिवीगाळ होत असल्याने त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करू नका, असे सांगितले.
यावरून वाद वाढला आणि गुप्ता यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर गुप्ता यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
या प्रकरणी बेकायदा जमाव आणि मारहाणीशी संबंधित कलमांनुसार महिलेसह इब्राहिम शेख, मुन्ना शेख, गुड्डू शेख, खलिजा शेख आणि इतर अशा एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फाटे करत आहेत.
