Pune Crime News | फ्लॅटची खरेदी करुन ताबा घेतला असताना कुलूप कटिंग मशीनने कापून दुसर्‍याने घेतला फ्लॅटचा ताबा

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | फ्लॅटची खरेदी करुन त्यांनी ताबा घेतला होता. ते तेथे राहत होते. असे असताना दुसर्‍याने फ्लॅटचे कुलूप कटिंग मशीनने कापून ताबा मिळविण्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत सचिन जनार्धन गवळी (वय ४३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा, सध्या रा. चंदननगर) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी भवानीसिंग पदमसिंग राव Bhavanisingh Padamsingh Rao (वय ३५, रा. रतन प्रेस्टीज बिल्डिंग, चंदननगर) व दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार चंदननगरमधील रतन प्रेस्टीज बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये ३ ऑक्टोंबर रोजी घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन गवळी हे रमेश शंकरलाल भंडारी यांच्या स्थावर मिळकतीचे देखभाल करण्याचे काम करतात. रमेश भंडारी (वय ७३) हे कॅम्पमध्ये रहात असून त्यांचा हॉटेल व्यवसाय आहे. त्यांनी रंजितकुमार रामचंद्र लोंढे यांचा चंदननगरमधील रतन प्रेस्टीज बिल्डिंगमधील फ्लॅट खरेदीचा करारनामा करुन ७० लाख रुपयांना विकत घेतला. फ्लॅटचा प्रत्यक्ष ताबा रमेश भंडारी यांना दिला. भंडारी यांना मिळकतीची देखभाल करणे शक्य नसल्याने त्यांनी ही जबाबदारी सचिन गवळी यांच्यावर सोपविली आहे. १ जून २०२६ पासून सचिन गवळी हे या फ्लॅटमध्ये राहायला आहेत. त्यासाठी त्यांनी फ्लॅटमध्ये सर्व जीवनावश्यक साहित्य, मौल्यवान वस्तू घेऊन ठेवल्या आहेत.

रंजीतकुमार लोंढे यांनी हा फ्लॅट रमेश भंडारी यांना विकला असताना फसवणूक करण्याच्या उद्देशाने परस्पर भवानीसिंग पदमसिंग राव यांना नोंदणीकृत पद्धतीने विक्री केला आहे. याबाबत रमेश भंडारी यांनी चंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. २ ऑक्टोंबर रोजी रात्री ८ वाजता ते प्रेस्टीज बिल्डिंगमधील फ्लॅटला कुलूप लावून आपल्या कुटुंबाकडे गेले होते. ३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ४ वाजता ते परत आले. दरम्यानच्या काळात त्यांनी लावलेले कुलूप कटिंग मशीनने कापून घरामध्ये अतिक्रमण केले होते. त्यांनी डोअरबेल वाजवल्यावर एका महिलेने अर्धवट दरवाजा उघडला. तेव्हा त्यांनी फ्लॅटमध्ये मी प्रत्यक्ष राहत असताना तुम्ही परवानगीशिवाय  कसा काय प्रवेश केला, अशी विचारणा केल्यावर तिने आम्ही आलोय, आम्ही काय सोडणार नाही, असे म्हणून दरवाजा लावून घेतला. त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलीस आले. त्यांनी विनंती करुनही त्यांनी सेफ्टी डोअर उघडला नाही. सचिन गवळी यांचे  फ्लॅट मध्ये राहण्याचे साहित्य, कपडे, गॅस, किचन साहितय, तसेच बेडरुममधील कपाटामधील बॅगमध्ये सोन्याची अंगठी, कानातील बाळी, असा अंदाजे १ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा ऐवज आहेत. पोलिसांनी फ्लॅटमध्ये बेकायदेशीर प्रवेश केलेल्याला नाव विचारल्यावर त्याने भवानी सिंग पदमसिंग राव असल्याचे सांगितले. चंदननगर पोलिसांनी अतिक्रमण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक साळवे तपास करीत आहेत.

You may have missed