Pune Crime News | आणखी एका ‘वैशाली हगवणे’चा बळी ! पायल झांबरेच्या आत्महत्येप्रकरणी पती अक्षय झांबरे याला अटक, 4 जणांवर गुन्हा दाखल (Videos)
पुणे : Pune Crime News | पुण्याला जाऊ नको, दोन दिवस इथेच रहा, असे सांगितले असताना पायल बोलली की आध्या पुण्यालाच आहे, तिची शाळा झाली की मी तिला घेऊन उद्या येईन, असे बोलून पायल गेली. ती कायमचीच अशी सल पायल झांबरे हिचा भाऊ ऋषिकेश रवींद्र पवार (वय ३१, रा. श्रीरामनगर, खेड शिवापूर) यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पायल अक्षय झांबरे (वय ३४, रा. मंगलमय इमारत, झांबरे पॅलेसजवळ, मुकुंदनगर) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
स्वारगेट पोलिसांनी तिचा पती अक्षय अरविंद झांबरे Akshay Arvind Zambre (वय ३८, रा. झांबरे पॅलेस मुंकुदनगर) याला अटक केली आहे. सासु मंगल अरविंद झांबरे Mangal Arvind Zambre (वय ५८), सासरे अरविंद झांबरे Arvind Zambre (वय ६५), नणंद अक्षता अरविंद झांबरे – निम्हण Akshata Zambre – Nimhan (वय ३०, सर्व रा. मंगलमय़ झांबरे पॅलेसजवळ, मुकुंदनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल हिचा विवाह अक्षय झांबरे याच्याबरोबर १३ मार्च २०१९ रोजी झाला होता. विवाहात हुंड्यापोटी ५० तोळे सोन्याचे दागिने, २५ लाख रुपये, तसेच विवाहाचा सर्व खर्च असा एकूण मिळून ७५ ते ८० लाख रुपये खर्च करण्यात आला होता. विवाहानंतर पती, सासू, सासरे, नणंदेने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. माहेरहून पैसे आणण्याची मागणी करुन छळ सुरू केला. पायल हिला घरकाम करण्यावरुन त्रास देत होते. तसेच तिला खर्च करण्यास पैसे देत नव्हते. त्यामुळे तिला खर्चाला देखील माहेरहून पैसे देत होते. तिने पती अक्षय याच्याकडे पैसे मागितले तर ते पायलला बोलत होते की तुझ्या खर्चासाठी तु स्वत: पैसे कमव. नोकरी कर आणि स्वत:चा खर्च स्वत: भागव. २०२२ मध्ये पायल गरोदर असताना तिची सासु मंगल, सासरे अरविंद, पती अक्षय हे तिला सतत मानसिक त्रास देत होते. आम्हाला मुलगाच हवा आहे, तुला मुलगाच झाला पाहिजे़ आमची समाजात प्रतिष्ठा आहे. त्यामुळे पायल हिला मुलगी झाली हे समजल्यानंतर तिचे सासरे, सासु व पती यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन पायल सोबत वाद केला होता की, आम्हाला मुलगा हवा होता, तुला मुलगी कशी झाली, आम्ही या मुलीला व तुलाही संभाळणार नाही, असे म्हणून हॉस्पिटलमधून निघून गेले होते. त्यावेळी पायलचे सिझेरियन प्रसूती झाल्याने हॉस्पिटलचा औषधोपचाराचा अंदाजे अडीच लाखांचा खर्च तिच्या माहेरच्यांनी केला होता. पायलला मुलगी झाल्यानंतर १ वर्ष झाले तरी तिच्या सासरचे तिला घेण्यास आले नाहीत. अक्षय व सासु मंगल हिला विचारल्यावर त्यांनी आम्हाला मुलगा पाहिजे होता, तुला मुलगी झाली आहे. त्यामुळे तुम्ही दोघी इकडेच रहा, पुण्याला यायचे नाही, तिकडेच माहेरी राहायचे. त्यानंतर झांबरे पॅलेस येथे बर्याच बैठका घेऊन समजुत काढून तिला परत सासरी पाठविले. तिला मुलगी झाली म्हणून शिव्या देत असत. तुला आम्ही एवढे बोलतो याची लाच वाटत नाही का, तुला आम्ही सांगितलेले वस्तू अथवा पैसे आणायला जमत नसतील तर आपला दुसरा फ्लॅट आहे, तिकडे जा, तिथे दोरी आहे, नाहीतर तुझी ओढणी घेऊन फॅनला तु व तुझी मुलगी लटकत का नाहीस असे बोलून तिला सतत मानसिक त्रास देत होते. पायल माहेरी आल्यावर हे सर्व सांगत असत. पुण्याला असताना घरी कोणी नसताना आईला फोन करुन सांगत होती.
नातीचा सर्व खर्च माहेरच्यांनी करण्याचे ठरले
पायल पुण्याला आल्यानंतर तिची सासु व पती अक्षय बोलायचे की तुझ्या घरचे मुलीला सांभाळायचा खर्च देतो बोलले होते़, परंतु, त्यांनी काहीच खर्च दिला नाही. त्यामुळे तु तुझ्या वडिलांकडून तुझ्या हिश्याची जमीन मागून घे आणि माझ्या मुलाच्या नावावर कऱ आणि यातील काहीच जमत नसेल तर माझा मुलगा अक्षय याच्यापासून तू घटस्फोट घे आणि तु तुझ्या मुलीला घेऊन आमच्या घरातून माहेरी निघून जा, असे बोलत असत. ऑगस्ट २०२६ मध्ये घडलेल्या या प्रकारानंतर परत दोन्ही घरातील लोकांची बैठक झाली. त्यात पायलची मुलगी आध्या हिचा सर्व शैक्षणिक, व लग्नाचा देखील सर्व खर्च आम्ही करु, तिला घटस्फोट देऊ नका, असे ठरले होते. त्यानंतर पायलचे सासरचे लोक तिला घरी घेऊन जाण्यास तयार झाले.
पायल होती शांत शांत
१ नोव्हेबर २०२६ रोजी पायल हिचा भाऊ ऋषिकेश याला मुलगी बघण्याकरीता बारामतीला जावयाचे असल्याने पायल सकाळी माहेरी आली होती. पायल दिवसभर शांत होती. ती कोणाशी काहीच बोलली नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी तिला सांयकाळी विचारले की, तू आज एवढी शांत का आहेस, काय झालय का. त्यावर ती मोठ्याने रडु लागली. तिने सांगितले की, ते मला आणि आध्या हिला खूप त्रास देतात. सासु येता जाता शिवीगाळ करुन मारहाण करते. सासरे हे दारु पिऊन आले की, गलिच्छ शिवीगाळ करतात. मला आता सहन होत नाही. त्यावर ऋषिकेश हे तिला बोलले की तु जाऊ नको पुण्याला, दोन दिवस इथेच रहा. पण पायल बोलली की आध्या पुण्यालाच आहे. तिची शाळा झाली की मी तिला घेऊन उद्या येईन, असे बोलून पायलने परत सांगितले की तिचे सासरे व सासु यांनी २०२६ च्या दिवाळीला ५ तोळे सोने घेऊन ये, असे सांगितले आहे, हे तिने त्यावेळी आपल्या भावाला सांगितले. सायंकाळी पायल कॅब करुन खेड शिवापूरहून पुण्याला गेली.
काय घडले शेवटच्या दिवशी
पुर्ण प्रवासात तिने एकही फोन अथवा मेसेज केला नाही़ त्यानंतर रात्री ९ वाजून १८ मिनिटांनी तिचा एक टेक्स्ट मेसेज आला की, ‘‘माझी सासु जबाबदार आहे’’ हा मेसेज वाचताच फिर्यादी यांनी पायलला फोन केला . तिने फोन उचलला नाही़ म्हणून तिचा पती अक्षय याला फोन केल्यावर त्याने सांगितले की, माझी आई व पायलचे भांडण सुरु आहे. तु आमचेत पडू नकोस, आमचे आम्ही पाहुन घेऊ, आमचे घरातील प्रत्येक गोष्टीत तोंड घालू नको, असे बोलून त्याने शिव्या दिल्या व रागाने फोन कट केला. हा प्रकार त्याने आईला सांगितल्यावर तिने फोन केला. परंतु त्यांनी कोणी फोन उचलले नाही. २ नोव्हेबर रोजी सकाळी ५ वाजता फिर्यादी यांच्या आईने पायलचे पती अक्षय याला फोन केला असता त्याचा फोन बंद होता. म्हणून मेसेज केला. पायल कुठे आहे, त्यावर मेसेजवर काही रिप्लाय आला नाही. त्यानंतर सकाळी ७ वाजता अक्षय याचा तिचे वडिलांच्या मोबाईलवर फोन आला. पायल घरी आली नाही. त्यानंतर ते सर्व पुण्याला आले़ त्यांनी पायल कोठे आहे, असे विचारल्यावर सासरे बोलले की, आम्हाला माहित नाही कुठे गेली आहे ती़ असेल कुठे तरी, अक्षय बोलला की ‘समोरच्या फ्लॅटमध्ये आहे बहुतेक’ असे म्हणताच फिर्यादी हे धावत समोरच्या फ्लॅटकडे गेले. दरवाजा बंद होता. त्यांनी मागील गॅलरीतील हॉलच्या दरवाजाची काच फोडून हॉलमध्ये गेले. दरवाजा उघडला. पायलचे आईवडिल, चुलती, पती हे फ्लॅटमध्ये आले. ते पायलला शोधत किचनमध्ये गेले असता तिने दोराच्या सहाय्याने गळफास घेतलेला दिसून आला. फिर्यादी यांनी तिला उचलून धरले. पण तिची हालचाल दिसून येत नव्हती. पायलला वाचविण्यासाठी भाऊ धडपडत असताना तिचा पती अक्षय हा गुपचुप तिथून निघून गेला. पोलीस आल्यावर त्यांनी पायलला खाली उतरवुन हॉस्पिटलला नेले.
या घटनेनंतर तिच्या नातेवाईकांनी झांबरे पॅलेसवर दगडफेक केली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. स्वारगेट पोलिसांनी हस्तक्षेप करुन सर्वांना शांत केले.
ऋषिकेश पवार यांची फिर्याद घेऊन चार जणांवर भा. न्या. संहिता कलम १०८, ८५, ३(५), ३५१, हुंडाबंदी अधिनियम १९६१ कलम ३ आणि ४ खाली गुन्हा दाखल करुन पती अक्षय झांबरे याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम तपास करीत आहेत.
