Creative Foundation | वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त व गरजूंना मदत करणे हीच खरी सामाजिक जबाबदारी : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Creative Foundation | Helping drought-affected people and those in need on birthdays is the real social responsibility: Union Minister of State Muralidhar Mohol

क्रिएटिव्ह फाउंडेशनतर्फे वैकुंठ विद्युतदाहिनीतील कर्मचारी व अंत्यविधी करणाऱ्या गुरुजींना आवश्यक साहित्याचे वाटप

पुणे : Creative Foundation | वाढदिवस साजरा करताना अनावश्यक खर्च करण्याऐवजी दुष्काळग्रस्त आणि गरजू नागरिकांना मदत करणे ही माणुसकीची जपणूक आणि सामाजिक जबाबदारी आहे. सर्वांनी अशा प्रकारे सामाजिक कार्यात योगदान दिल्यास त्यांच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचतील आणि मलाही समाधान मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. तसेच वैकुंठ स्मशानभूमीतील उणिवा दूर करण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ९ नोव्हेंबर रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने वैकुंठ विद्युतदाहिनीतील कर्मचारी आणि अंत्यविधी करणाऱ्या गुरुजींना आवश्यक साहित्य भेट देण्यात आले. या उपक्रमावेळी मोहोळ बोलत होते.

यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, विश्वस्त प्रतीक खर्डेकर, वैकुंठ येथील गुरुजी अथर्व मोघे, प्रशांत मोघे, अजित मोघे, मयूर वैद्य, विद्युतदाहिनीचे पर्यवेक्षक गोरखनाथ कांबळे, कर्मचारी श्रीनिवास कोटा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी संदीप खर्डेकर म्हणाले की, वैकुंठ परिवाराशी माझे गेल्या ३५ वर्षांपासून जिव्हाळ्याचे नाते आहे. येथील गुरुजी आणि कर्मचाऱ्यांशी माझे भावनिक संबंध असून, त्यांच्या सुखदुःखात मी नेहमीच सहभागी असतो. वैकुंठ येथे कार्यरत असलेले कर्मचारी पुणेकरांची अत्यंत महत्त्वाची सेवा बजावत आहेत. त्यांच्या या सेवेचे मोल पैशात किंवा वस्तूंच्या स्वरूपात करता येणार नाही. त्यामुळे भविष्यातही वैकुंठ विद्युतदाहिनीला आवश्यक असणारे साहित्य आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रिएटिव्ह फाउंडेशन कटिबद्ध राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.

क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले की, मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय फाउंडेशनने घेतला आहे. वैकुंठ विद्युतदाहिनीतील कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्याचे वाटप हा त्याच उपक्रमांचा एक भाग आहे.

वाढदिवसानिमित्त नऊ दिवस सामाजिक उपक्रम

मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त सलग नऊ दिवस रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे आणि अन्य समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही मंजुश्री खर्डेकर यांनी दिली.

वाढदिवसाचा उत्सव सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

You may have missed