Pune Crime News | सुरक्षा रक्षक, चिकन शॉपमधील कामगाराचे मोबाईल, रोकड जबरदस्तीने चोरुन नेणार्या तिघा चोरट्यांपैकी वाघोली पोलिसांनी एकाला केली अटक
पुणे : Pune Crime News | सुरक्षा रक्षक आणि चिकन शॉपमधील कामगाराचे मोबाईल काढून घेऊन दुकानातील रोकड जबरदस्तीने चोरुन नेणार्या तिघा चोरट्यांपैकी एकाला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे.
समीर कलंदर शेख Sameer Qalandar Shaikh (वय १९, रा. मुंढवा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याचे साथीदार आदित्य जाधव आणि शुभम हे फरार आहेत. चोरट्यांनी चिकन शॉपमधील कामगाराच्या मोबाईलवरुन सुरक्षा रक्षकाच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले. त्यानंतर दोघांचे मोबाईल चोरल्यानंतर सुरक्षा रक्षकाच्या खात्यातील पैसे समीर शेख च्या बँक खात्यात ट्रान्सफर केले.
याबाबत हरिशचंद्र ब्रिजमोहन सरोज (वय ४०, रा. गोदरेज प्रॉपर्टी प्रोजेक्ट, लेबर कॅम्प, मांजरी खुर्द) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मांजरी खुर्द येथील गोदरेज प्रॉपर्टी प्रोजेक्ट लेबर कॅम्प येथे ७ नोव्हेंबर रोजी पहाटे पावणेतीन वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिशचंद्र सरोज हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. तिघे चोरटे पहाटे पावणे तीनच्या सुमारास आले. त्यांनी सरोज यांना दमदाटी करुन खाली बसायला लावले. त्यानंतर त्यांनी बद्रे मिर्झा यांना चिकन शॉपमधून उठवून आणले. मिर्झा यांच्या दुकानातील ८ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. मिर्झा यांच्या मोबाईलवरुन त्यांच्याकडील १४०० रुपये सरोज यांच्या खात्यात ट्रान्सफर केले. त्यानंतर दोघांना दमदाटी करुन ते दोघांचे मोबाईल घेऊन काळया रंगाच्या स्कुटीवरुन पळून गेले. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी दोघांचे मोबाईलचा तपास सुरु केला. त्यात चोरट्यांनी सरोज यांच्या खात्यावर ट्रान्सफर केलेले पैसे त्यांनी समीर शेख याच्या खात्यावर ट्रान्सफर केले व त्यानंतर मोबाईल बंद केल्याचे दिसून आले. यावरुन पोलिसांनी समीर शेख याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरु आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिवशंकर राघु तपास करीत आहेत.
