Pune PMC News | कल्याणी नगरमधील ‘वेलेन्सिया’ प्रकल्पात अनधिकृत बांधकामाचा आरोप; ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्डचे प्रदेशाध्यक्ष सनी निम्हण यांची कारवाईची मागणी, विकासकाला महापालिकेची नोटीस

Pune PMC News | Allegations of unauthorized construction at the ‘Valencia’ project in Kalyani Nagar; Sunny Nimhan demands action, Municipal Corporation issues notice to the developer

पुणे : Pune PMC News |  कल्याणी नगर येथील ‘वेलेन्सिया’ प्रकल्पात (Valencia Project Kalyani Nagar) मंजूर नकाशापेक्षा अतिरिक्त मजले आणि वाढीव बांधकाम करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्डचे (All India Anti-Corruption Board) प्रदेशाध्यक्ष सनी निम्हण (Sunnybahu Nimhan) यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी पुणे महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार करून प्रकल्पाची तातडीने स्थळ पाहणी आणि अधिकृत संयुक्त मोजणी करण्याची मागणी केली आहे.

निम्हण यांच्या तक्रारीनुसार, संबंधित प्रकल्पाला महापालिकेच्या झोन क्रमांक ४ कार्यालयाने १९ ऑक्टोबर २०२२ रोजी बांधकाम थांबविण्याबाबत पत्र दिले होते. मात्र, मंजूर नकाशातील मजल्यांची संख्या, मजलानिहाय क्षेत्रफळ, एकूण बांधकाम क्षेत्र, एफएसआय, टीडीआर, पार्किंग, रिफ्युज एरिया आणि साइड मार्जिन यामध्ये प्रत्यक्ष बांधकामाशी मोठी तफावत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

सातव्या मजल्यावरील बांधकामाबाबत विकासकाला नोटीस

या तक्रारीची दखल घेत पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग क्रमांक ४ ने संबंधित मालक तथा विकासक पंकज जतकर यांना २२ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम २६० (१ अ) अन्वये नोटीस बजावली आहे.

सातव्या मजल्यावर विनापरवाना बांधकाम झाल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित बांधकामासाठी परवानगी घेण्यात आली आहे का, याबाबत १५ दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देश नोटिशीत देण्यात आले आहेत.

स्ट्रक्चरल ऑडिट, फायर सेफ्टी तपासणीसह १७ मागण्या

निम्हण यांनी आपल्या तक्रारीत मंजूर पार्किंगच्या जागेत बांधकाम झाले असल्यास ते हटविणे, प्रकल्पाचे स्वतंत्र स्ट्रक्चरल ऑडिट आणि अग्निसुरक्षा तपासणी करणे, तसेच अनधिकृत बांधकाम आढळल्यास संबंधित विकासक, वास्तुविशारद आणि अभियंत्यांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याशिवाय, संबंधित प्रकरणातील कारवाई पूर्ण होईपर्यंत प्रकल्पाला पूर्णत्वाचा दाखला आणि भोगवटा प्रमाणपत्र देऊ नये, अशीही मागणी करण्यात आली आहे.

आपली तक्रार कोणत्याही वैयक्तिक वादातून नसून सार्वजनिक हितासाठी आणि बांधकाम नियमांचे पालन व्हावे या उद्देशाने केल्याचे सनी निम्हण यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, महापालिकेच्या नोटिशीला विकासकाने काय उत्तर दिले आणि त्यानंतर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात महापालिका प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

You may have missed