Pune Crime News | पतीच्या खात्यातून काढलेले पैसे, दागिने परत मागितल्याने दिराने शिक्षिकेच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करुन केला खुन; सासवड पोलिसांनी दिराला केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  पतीच्या आजारपणात तसेच त्याच्या मृत्युनंतर त्याचे घेतलेले पैसे, चेक, सोन्याचे दागिने व इतर कागदपत्रे परत मागितल्याच्या कारणावरुन दिराने शिक्षिकेच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करुन भर रस्त्यात खुन केला. सासवड पोलिसांनी दिराला अटक केली आहे.

उज्वला रामदास काकडे (वय ४७, रा. पांगारे, ता. पुरंदर) असे खुन झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. पोलिसांनी शशिकांत माणिकराव काकडे Shashikant Manikrao kakde (वय ५१, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) याला अटक केली आहे. याबाबत त्यांचा भाऊ गणेश दत्तात्रय मेमाणे (वय ३९, रा. हडपसर) यांनी सासवड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.  ही घटना पुरंदर तालुक्यातील पांगारे गावात १९ नोव्हेंबर रोजी सकाळी पावणे नऊ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्वला काकडे या हडपसर येथील साधना विद्यालयात शिक्षिका होत्या. त्यांचे पती रामदास माणिकराव काकडे हे आजारी असताना त्यांचे दीर शशिकांत काकडे याने त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतले होते. रामदास काकडे यांच्या मृत्युनंतरही त्यांचे पैसे, चेक, सोन्याचे दागिने व इतर कागदपत्रे शशिकांत काकडे यांच्याकडे होते. उज्वला काकडे यांनी ते सर्व परत मागितले होते. त्यावरून त्यांच्यात वाद होत होता.

उज्वला काकडे या १९ नोव्हेंबर रोजी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास शाळेत जाण्यासाठी घरातून पायी निघाल्या़ वाटेत जात असताना शशिकांत काकडे हा कारमधून आला़. त्याने पाठीमागून उज्वला काकडे यांच्यावर हल्ला केला. डोक्यात लोखंडी रॉड व वीटने मारहाण करुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यात उज्वला काकडे यांचा जागीच मृत्यु झाला. शशिकांत काकडे याला अटक केली असून त्याला पाठबळ देणार्‍या उज्वला काकडे यांच्या सासु सुलोचना माणिकराव काकडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक वैभव सोनावणे तपास करीत आहेत.

You may have missed