Pune PMC News | सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या सभागृहातील आंदोलनानंतर महापालिका आयुक्त ‘राम’ यांनी उचलले ‘धनुष्य’, शहरातील फ्रंट व साईड मार्जीन व पार्किंगच्या जागेतील अडीच लाख अतिक्रमण दोन महिन्यांत हटविणार
हस्तक्षेप करणार्यांचे नाव जाहीर करण्याचे अधिकार्यांना आदेश
पुणे : Pune PMC News | रस्त्यांवरील पथारींपेक्षा त्यामागील दुकाने आणि इमारतींमधील पार्किंगच्या जागेतील अनधिकृत व्यावसायांमुळे अतिक्रमणे वाढली आहेत. पुढील दोन महिन्यांत शहरातील प्रमुख रस्त्यांवरील दुकाने आणि व्यावसायीक आस्थापनांबाहेरील तसेच इमारतींच्या पार्किंगमधील अतिक्रमणे काढून टाकण्याची व्यापक मोहीम हाती घेतली जाणार आहे. पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमणे आढळल्यास त्या आस्थापना सील करण्यात येणार असून कारवाईसाठी कोणी दबाव आणल्यास त्यांची नावे सार्वजनिकरित्या जाहिर करण्यात येतील, असा इशारा देत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी त्यांचे इरादे स्पष्ट करत अतिक्रमण मुक्त पुण्याचे ‘धनुष्य’ उचलल्याचे स्पष्ट केले.
दोनच दिवसांपूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांबाबत सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांनी आंदोलन करत महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि प्रशासनावर जिव्हारी लागणारी टीका केल्यानंतर आयुक्त स्वत: फिल्डवर उतरले आहेत. फर्ग्युसन रस्त्यावरील कारवाई पाठोपाठ, जंगली महाराज रस्ता, कोथरूड, शिवाजी रस्त्यावरील अनधिकृत व्यावसायींकावर मागील तीन दिवसांत जोरदार कारवाई करत प्रशासनाला असलेल्या अधिकारांची जाणीव करून दिली आहे. मागील तीन दिवसांतील फिल्डवरील कारवाईनंतर घेतलेल्या निर्णयाची माहिती आयुक्त राम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर उपस्थित होते.
आयुक्त राम म्हणाले, शहरातील अतिक्रमण हे प्रशासनाचे अपयश आहे, हे मी मान्य करतो. मागे काय झाले यापेक्षा पुढे काय करायचे यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. पाहणी मध्ये रस्त्यावरील पथारी पेक्षा त्यामागील इमारतींमधील फ्रंट मार्जीन मधील तसेच पार्किंगमधील आरक्षणे कारणीभूत आहेत. पार्किंग आणि फ्रंट मार्जीनमध्ये व्यवसाय होत असल्याने शहरात अनेक रस्त्यांवर वाहने उभी राहात असल्याने वाहतुकीची तसेच पादचार्यांचीही कोंडी होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वच रस्त्यांवरील फ्रंट आणि साईड मार्जीनमधील व्यावसायीक ओटे, रेलिंग, ओनिंग सर्व काढुन टाकण्यात येणार आहे. अधिकृत पथारी व्यावसायीकांचे पुर्नवसन करण्यासाठी योजना तयार करण्यात येईल. आज मितीला शहरात केवळ २२ हजार परवानाधारक पथारी व्यावसायीक असताना जवळपास अडीच ते तीन लाख अनधिकृत व्यावसायीक आहेत. यापैकी बहुतांश हे फ्रंट आणि साईड मार्जीनमध्ये व्यवसाय करतात. या व्यावसायीकांनी स्वत: अतिक्रमणे काढून घ्यावीत अन्यथा त्यांचे व्यवसायीक आस्थापना सील करण्यासारखी देखिल कारवाई करण्यात येईल.
कुठल्याही सुट्टीशिवाय पुढील दोन महिने अविरत सुरू राहाणार्या या कारवाईसाठी अतिरिक्त बुलडोझर, जेसीबी आणि यंत्र सामुग्री व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. सुरक्षित कारवाईसाठी एमएसएफचे १०० जवान ांची सेवा यासाठी घेण्यात येईल. कारवाई रोखण्यासाठी कोणाचाही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. कोणी हस्तक्षेप केलाच तर त्याचे नाव जाहीर करण्याचे आदेश सर्व क्षेत्रिय अधिकार्यांसह वरिष्ठ अधिकार्यांना देण्यात आल्याचेही आयुक्त राम यांनी जाणीवपूर्व नमूद करत लोकप्रतिनिधींना इशारा दिला आहे.
महत्वाचे मुद्दे:
* शहरात फ्रंट मार्जीन ,साईड मार्जीन आणि पार्किंगच्या जागेमध्ये अडीच लाखांहून अधिक बेकायदा व्यावसायीक.
* पुढील दोन महिने अविरत कारवाई सुरू राहाणार
* कारवाईच्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाल्यास बांधकाम विभाग व अन्य विभागांच्यावतीने संबधित व्यावसायीकावर कडक कारवाई.
* कारवाईमध्ये कोणाचाही हस्तक्षेप सहन करणार नाही. हस्तक्षेप करणार्याचे नाव जाहीर करणार.
अतिक्रमणं हे प्रशासनाचे अपयश आहे. यापुर्वी काय झाले याचा विचार सोडुन द्यावा लागेल. नागरिकांना चांगले व सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी काही कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणाच्या प्रश्नामुळे ही बाब अधोरेखित झाली आहे. अधिकार्यांनी त्यांच्या अधिकारांचा योग्य वापर केल्यास अतिक्रमण व इतर प्रश्न निर्माण होणार नाहीत, याची जाणीव महापालिका प्रशासनासोबतच पोलिस प्रशासनानेही लक्षात घेण्याची गरज आहे. अतिक्रमणांचा भस्मासूर रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येउन प्रयत्न करूयात.
– नवल किशोर राम, महानगरपालिका आयुक्त.
