Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून दाम्पत्यावर टोळक्याचा हल्ला; पत्नीच्या डोळ्यात मिरची पूड फेकली, मोटारीची तोडफोड; महिलेला अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून तरुणाला अडवून शस्त्राने हल्ला करत त्याच्या पत्नीलाही बेदम मारहाण केल्याची घटना हडपसरमधील माळवाडी परिसरात घडली. आरोपींनी तरुणाच्या मोटारीची तोडफोड केली. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पत्नीच्या डोळ्यात मिरची पूड फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वाती विनोद कदम Swati Vinod Kadam (वय ३७, रा. भैरवनाथ चौक, माळवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाचा आरोपींसोबत पूर्वी वाद झाला होता. शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास तरुण आपल्या मित्राला सोडून घरी परतत होता. त्यावेळी माळवाडी परिसरात आरोपींच्या टोळक्याने त्याला अडवले.

आरोपींनी तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्यावर शस्त्राने वार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याच वेळी आरोपींनी त्याच्या मोटारीचीही तोडफोड केली.

पतीला मारहाण होत असल्याचे पाहून त्याच्या पत्नीने मध्यस्थी करत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी तिलाही मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता तिच्या डोळ्यात मिरची पूड फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेनंतर पीडित तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी हडपसर पोलिसांनी एका महिलेसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी स्वाती कदम हिला अटक करण्यात आली असून, अन्य आरोपींच्या सहभागाबाबत तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया कोलेवाड करत आहेत.

You may have missed