Hemant Aba Bagul | पुणे शहराची ओळख ‘पेन्शनरांचे शहर’ ते ‘क्राईम सिटी’ अशी होणे ही अत्यंत चिंताजनक बाब!

Hemant Aba Bagul

शहरात मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या बंदुका आणि कोयते नेमके येतात कुठून? याचा पोलिसांनी शोध घ्यावा – हेमंत आबा बागुल

Hemant Aba Bagul | पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. मात्र, या वाढत्या गुन्हेगारीमागील मूळ प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर बंदुका आणि कोयते नेमके येतात कुठून? या घातक शस्त्रांचा पुरवठा कोण करत आहे? यामागे नेमकी कोणती टोळी किंवा यंत्रणा कार्यरत आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधणे आज अत्यंत आवश्यक झाले आहे.

आज पुणे शहराच्या विविध भागांमध्ये, विशेषतः वस्तीच्या परिसरांमध्ये, बंदुका आणि कोयत्यांचा वापर करून दहशत निर्माण करण्याचे प्रकार वाढत आहेत. अवघ्या २० ते २५ हजार रुपयांमध्ये बंदुका सहज उपलब्ध होत असल्याच्या चर्चा आहेत. जर शहरात इतक्या सहजपणे बंदुका उपलब्ध होत असतील, तर त्यांचा पुरवठा करणारी साखळी किती मोठी असेल, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

केवळ गुन्हेगारांकडून शस्त्रे जप्त करून चालणार नाही, तर ही शस्त्रे तयार कुठे होतात, शहरात आणली कुठून जातात, त्यांचा पुरवठा कोण करतो आणि या संपूर्ण नेटवर्कमागे कोणाचे आशीर्वाद आहेत, याचा पोलिसांनी शोध घेणे गरजेचे आहे.

तसेच, अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई झाल्यानंतर त्यांना तातडीने जामीन मिळत असल्याच्या घटनांचाही गांभीर्याने आढावा घेण्याची आवश्यकता आहे. अवैध शस्त्र बाळगण्याचे प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई आणि प्रभावी पाठपुरावा होणे गरजेचे आहे.

एकीकडे पुणे शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. रोजगार, व्यवसाय आणि व्यापाराच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर नागरिक पुण्यात येत आहेत. शहराचा विकास आणि नागरिकांचे स्वागत याला आमचा विरोध नाही. मात्र, या वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन कुठे आहे? शहरात येणाऱ्या अवैध शस्त्रांच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोणाची? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने दिली पाहिजेत.

एकेकाळी ‘पेन्शनरांचे शहर’ आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्याची ओळख आज ‘क्राईम सिटी’ म्हणून निर्माण होत असेल, तर ही प्रत्येक पुणेकरासाठी अत्यंत खेदजनक आणि चिंतेची बाब आहे.

पोलिसांना शहरातील अनेक संवेदनशील भागांमध्ये सुरू असलेल्या अवैध शस्त्रांच्या हालचालींची माहिती असते, अशी नागरिकांची भावना आहे. मग प्रश्न असा आहे की, या माहितीच्या आधारे ठोस कारवाई कोण करणार? कारवाईची जबाबदारी कोण घेणार? आणि गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कठोर भूमिका कोण घेणार?

आता केवळ बैठका घेऊन किंवा घटना घडल्यानंतर प्रतिक्रिया देऊन चालणार नाही. पुणे पोलिसांनी तातडीने पुढील उपाययोजना कराव्यात:

  1. शहरात अवैध बंदुका आणि कोयत्यांचा पुरवठा करणाऱ्या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेऊन त्यावर कारवाई करावी.
  2. अवैध शस्त्रांची निर्मिती, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
  3. गुन्हेगारीसाठी संवेदनशील असलेल्या वस्ती आणि परिसरांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवावी.
  4. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आणि त्यांचा वापर करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करून जामीन प्रक्रियेत कायदेशीर विरोध प्रभावीपणे नोंदवावा.
  5. गुन्हेगारांना शस्त्रे पुरवणाऱ्या आर्थिक आणि संघटित गुन्हेगारी साखळीचा तपास करावा.
  6. शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांची गस्त आणि गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करावी.

पुणेकरांच्या जीविताचे आणि सुरक्षिततेचे रक्षण करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. आज वेळीच कठोर पावले उचलली नाहीत, तर ही गुन्हेगारी आणखी फोफावण्याची भीती आहे.

आता हातावर हात ठेवून बसण्याची वेळ नाही! पुणे शहराला गुन्हेगारीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृती करावी. पुण्याची ओळख पुन्हा एकदा सुरक्षित, सांस्कृतिक आणि सुसंस्कृत शहर म्हणून निर्माण झाली पाहिजे!

You may have missed