Alandi Pune News | पुणे : ‘चेहऱ्याची त्वचा खराब होईल म्हणून पाण्यात गेलो नाही अन् वाचलो; पण, डोळ्यांसमोर आठ मित्र गेले’ ! दिवेआगर दुर्घटनेतील विद्यार्थ्याची व्यथा
पुणे/आळंदी: Alandi Pune News | दिवेआगर समुद्रकिनारी झालेल्या दुर्घटनेत आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर सहलीतून बचावलेल्या विद्यार्थ्यांच्या मनावर खोल परिणाम झाला आहे. या दुर्घटनेतून बचावलेला विद्यार्थी सोहम गोविंद गोरे याने आपल्या मित्रांना गमावल्याची वेदना व्यक्त करत संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
आळंदीतील स्मशानभूमीत सुमित अहिरे, तन्मय वहिले, कैवल्य वासनकर आणि प्रणव बनसोडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे विद्यार्थी शाळेपासून अनेक वर्षे एकत्र असल्याने सोहम आणि त्याचे पालकही अंत्यविधीसाठी उपस्थित होते.
सोहमने सांगितले की, समुद्रात उतरायचे की किनाऱ्यावर थांबायचे याचा निर्णय विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आला होता. त्वचेच्या त्रासामुळे त्याने समुद्रात न उतरण्याचा निर्णय घेतला.
त्याच्या म्हणण्यानुसार, काही विद्यार्थी आणि शिक्षक समुद्रात उतरले होते. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने काही जण समुद्राच्या दिशेने वाहू लागले. शिक्षक आणि पोहता येणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी मदतीचा प्रयत्न केला. काही जणांना वाचविण्यात यश आले, तर काही विद्यार्थी स्वतः किनाऱ्यावर परतले. मात्र आठ विद्यार्थ्यांना वाचवता आले नाही.
सोहम म्हणाला, “मी समुद्रकिनाऱ्यापासून थोडा दूर असल्याने सुरुवातीला नेमके काय घडले ते समजले नाही. पोलिस आणि स्थानिकांचा गोंधळ दिसल्यानंतर पुढे गेलो. तेव्हा आपलेच मित्र समुद्रात बुडाल्याचे समजले. तो क्षण आयुष्यभर विसरता येणार नाही.”
त्याच्या माहितीनुसार, सहलीची सुरुवात गुरुवारी पहाटे आळंदीतून झाली होती. विद्यार्थी आणि शिक्षकांचा गट आधी रायगड किल्ल्यावर गेला. तेथे ट्रेक आणि जेवणानंतर दुपारनंतर दिवेआगरला पोहोचलो.
दिवेआगर येथे काही विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी उतरले, तर काही जण किनाऱ्यावर थांबले. त्यानंतर काही मिनिटांतच दुर्घटना घडली.
सोहमने दिवेआगर येथील स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचावकार्य करणाऱ्या व्यक्तींनी विद्यार्थ्यांची काळजी घेतल्याचेही सांगितले. आळंदीतील प्रशासन आणि पोलिसांकडूनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची माहिती त्यांच्या पालकांना देण्यात आली.
“ज्यांच्यासोबत वर्षानुवर्षे शिकलो, खेळलो आणि काही तासांपूर्वीपर्यंत एकत्र होतो, ते मित्र आता आपल्यात नाहीत, ही गोष्ट स्वीकारणे खूप कठीण आहे,” अशी भावना सोहमने व्यक्त केली.
