Bapu Pathare MLA | येरवडा क्रीडा संकुलातील त्रुटींवर कारवाईची आमदार बापूसाहेब पठारे यांची मागणी; अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी दौरा संपन्न
पुणे: Bapu Pathare MLA | येरवडा येथील महाराष्ट्र विभागीय क्रीडा संकुल येथे आमदार बापूसाहेब पठारे यांनी सकाळी ६. ३० वा. अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा करत संकुलातील विविध सुविधांचा आढावा घेतला. यावेळी युवराज नाईक (क्रीडा उपसंचालक, पुणे विभाग), पराग नाईक (शाखा अभियंता) तसेच वैशाली दरवडे (क्रीडा अधिकारी) उपस्थित होत्या.
पाहणीदरम्यान संकुलातील सुविधा असूनही त्यांचा प्रभावी वापर होत नसल्याचे तसेच काही कामे दीर्घकाळ प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. विशेषतः मैदानाचे काम ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे बंद असून संबंधितांकडून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी थकीत असल्याची बाब समोर आली. याबाबत आमदार पठारे यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की, “१५-१६ वर्षांपासून संकुल कार्यान्वित असतानाही काही मूलभूत बाबी अपूर्ण आहेत. ठेकेदाराकडून पूर्ण भाडे वसूल होत नसून केवळ ३०-४० टक्केच रक्कम दिली जाते. काम पूर्ण होत नसेल तर तत्काळ कारवाई करून ते काम काढून घेणे आवश्यक आहे. तसेच थकीत रकमेची संपूर्ण वसुली करून शासनानेच संकुलाचा विकास हाती घ्यावा.”
सदर संकुल पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी येणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठोस भूमिका घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देत या ठिकाणाहून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडावेत, ऑलिंपिकवीर घडावेत ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यासोबतच सुरक्षा, स्वच्छता व देखभाल-दुरुस्ती कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत प्रलंबित कामे लवकर पूर्ण केली जातील, असेही त्यांनी सांगितले. क्रीडा संकुलाच्या उन्नतीसाठी पठारे यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरणार असून याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
