CM Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा तो ‘एक फोन’ आणि राहुरीच्या राजकारणाला कलाटणी: प्राजक्त तनपुरेंचे मानले आभार
अहिल्यानगर : CM Devendra Fadnavis | अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीने राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे लागलेल्या या पोटनिवडणुकीत, त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जाहीर सभा घेतली. या सभेत फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे जाहीर आभार मानले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अक्षय कर्डिले यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण करू शकणारे प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला होता. फडणवीस जेव्हा केरळ दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी तिथूनच तनपुरे यांना फोन केला. “प्राजक्तजी, शिवाजीराव कर्डिले यांच्यासारखा मोठा नेता आपल्यातून गेला आहे, ही पोटनिवडणूक आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेल असा निर्णय तुम्ही घ्यावा,” अशी विनंती फडणवीस यांनी केली. विशेष म्हणजे, या एका फोननंतर अवघ्या एका मिनिटात प्राजक्त तनपुरे यांनी फडणवीसांचा शब्द मानला आणि उमेदवारी अर्ज न भरता निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. फडणवीस यांच्या सभेतच त्यांचा पक्षप्रवेश होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, कालच्या सभेत तसे काही घडले नाही. स्वतः तनपुरे यांनीही “मी अद्याप कोणाच्याही व्यासपीठावर गेलो नाही,” असे म्हणत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. तरीही, फडणवीस यांनी भरसभेत त्यांचे आभार मानल्याने राहुरीच्या राजकारणात भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यापेक्षाही सध्या तनपुरे यांच्याच नावाची जास्त चर्चा आहे.
