Creative Foundation Pune | प्रतिकूल परिस्थितीतही पुणेकरांना सेवा देणाऱ्या PMPML कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद – संदीप खर्डेकर
स्वारगेट डेपोतील दत्त प्रतिष्ठानला क्रिएटिव्ह फाउंडेशनतर्फे स्पीकर सेट भेट
पुणे : Creative Foundation Pune | पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) कर्मचाऱ्यांना अनेकदा नागरिकांच्या नाराजीला सामोरे जावे लागते. मात्र, ऊन, पाऊस आणि थंडीची पर्वा न करता पुणेकरांना अविरत सेवा देणाऱ्या पीएमपीएमएलच्या चालक, वाहक आणि वाहन दुरुस्ती विभागातील कर्मचाऱ्यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केले.
पीएमपीएमएलच्या स्वारगेट वाहन डेपोतील कर्मचाऱ्यांच्या दत्त प्रतिष्ठानला क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने स्पीकर सेट भेट देण्यात आला. या कार्यक्रमात खर्डेकर बोलत होते.
यावेळी संदीप खर्डेकर म्हणाले की, पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि अरुंद रस्त्यांमधून साधी दुचाकी चालवतानाही नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत मोठ्या प्रवासी बसचे सुरक्षितपणे संचालन करणे हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे. पीएमपीएमएलचे चालक आणि वाहक ही जबाबदारी दररोज पार पाडतात.
त्याचप्रमाणे, जुन्या झालेल्या बसची देखभाल आणि दुरुस्ती करून त्या पुन्हा प्रवासी सेवेसाठी रस्त्यावर आणण्याचे महत्त्वाचे काम डेपोतील तांत्रिक कर्मचारी करतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यात या सर्व कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
दत्त प्रतिष्ठानला आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही
या कार्यक्रमात क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या विश्वस्त तथा नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी दत्त प्रतिष्ठानच्या उपक्रमांचे कौतुक केले. प्रतिष्ठानच्या कार्यासाठी भविष्यात आवश्यक ती मदत करण्यास क्रिएटिव्ह फाउंडेशन सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या वेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, विकास जाधव, शैलेश जगताप, गणेश परदेशी, श्री. चिकणे, उमेश दाभेकर यांच्यासह पीएमपीएमएलचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार असलेल्या पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
