Pune Pokhari Ghat Accident | पुणे : आंबेगाव तालुक्यातील पोखरी घाटात चारचाकी दरीत कोसळली; दोघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी
पुणे / मंचर : Pune Pokhari Ghat Accident | पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पोखरी घाटात बुधवारी (२८ ऑक्टोबर) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. प्रवाशांना घेऊन जाणारी मारुती सुझुकी इको गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये चालक ज्ञानेश्वर गोविंद गवारी (वय ४१) आणि कलाबाई भोजने यांचा समावेश आहे. दोघेही आंबेगाव तालुक्यातील रहिवासी होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भीमाशंकर मार्गावरील पोखरी घाटातून सहा जणांना घेऊन इको गाडी जात होती. घाटातील तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी सुमारे २०० ते ३०० फूट खोल दरीत कोसळली.
या अपघातात कांचन संदीप केंगले (वय ३५), योगेश देवराम भांगे (वय २६), शिवाजी मारुती डामसे (वय ६०) आणि सुभद्रा प्रमोद केंगले (वय ४०) हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच घोडेगाव पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. दरीत कोसळलेल्या वाहनातील जखमींना बाहेर काढून तातडीने घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींना मंचर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, चौघांचीही प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यातील रुग्णालयात पाठविण्यात आले.
दरम्यान, दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत.
या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
