Fertilizer Price Hike | ऐन खरिपाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किंमतीत मोठी वाढ; शेतकरी चिंतेत

Fertilizer Price Hike | Big increase in the price of chemical fertilizers on the eve of Kharif; Farmers are worried

मुंबई :  Fertilizer Price Hike | राज्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असून शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे. मात्र, ऐन हंगामाच्या तोंडावरच शेतकऱ्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत अचानक मोठी वाढ झाली असून, यामुळे बळीराजा पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रासायनिक खतांच्या किंमतीत प्रतिगोणी तब्बल २०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या नियंत्रणामुळे युरिया आणि डीएपी या खतांचे दर तूर्तास स्थिर असले, तरी बाजारातील इतर सर्व प्रमुख संयुक्त रासायनिक खतांच्या किंमती कमालीच्या वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी, आखाती देशांमधील वाढता तणाव आणि इंधनाचे (पेट्रोल-डिझेल) कडाडलेले दर यांमुळे खतांच्या निर्मितीचा आणि वाहतुकीचा खर्च वाढला आहे, ज्याचा थेट फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे.

सध्याच्या परिस्थितीत शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आधीच अडचणीत आहे. त्यातच बियाणे, मजुरी आणि आता खतांच्या वाढलेल्या किंमतींमुळे शेतीचा एकूण उत्पादन खर्च प्रचंड वाढणार आहे. परिणामी, सामान्य शेतकऱ्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.

येत्या काही दिवसांत खतांचे दर आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बाजारातील खतांचा काळाबाजार रोखला जावा, खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये आणि सरकारने तातडीने हस्तक्षेप करून खतांचे दर नियंत्रणात आणावेत, अशी तीव्र मागणी आता राज्यभरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. सरकार यावर काय पावले उचलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

You may have missed