Hemant Bagul News | पुणेकरांच्या उत्सवावर नियमांचा बडगा, कंपन्यांच्या जाहिरातींवर मूकसंमती; हा दुटप्पी कारभार बंद करा! – युवा सेनेचे पुणे महानगर अध्यक्ष हेमंत बागुल

Hemant Bagul

Hemant Bagul News | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी परवानगीविना तसेच महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन करून बॅनर, होर्डिंग्ज आणि जाहिरातींचा सुळसुळाट सुरू असल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे. पुणेकरांच्या उत्सवावर महापालिका प्रशासन नियमांचा बडगा उगारत असताना व्यावसायिक कंपन्यांकडून सुरू असलेल्या अनधिकृत जाहिरातबाजीबाबत प्रशासन मूकसंमतीची भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप युवा सेनेचे पुणे महानगर अध्यक्ष हेमंत बागुल यांनी केला आहे.

याबाबत बागुल यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देत अनधिकृत जाहिरातबाजी करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गणेशोत्सव हा पुणे शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनातील महत्त्वाचा उत्सव आहे. या काळात शहरातील सार्वजनिक जागा, रस्ते आणि चौकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. मात्र याच गर्दीचा आणि उत्सवाच्या वातावरणाचा फायदा घेत काही व्यावसायिक कंपन्या मोठमोठे बॅनर, होर्डिंग्ज आणि जाहिराती लावत असल्याचे युवा सेनेचे म्हणणे आहे. या जाहिरातींसाठी आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का, महापालिकेचे शुल्क भरले आहे का आणि जाहिरात फलक उभारण्याचे नियम पाळले आहेत का, याची प्रशासनाने कठोर तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

महापालिकेच्या महसुलावरही डल्ला?

अनधिकृत जाहिरातबाजीमुळे केवळ शहराचे विद्रुपीकरण होत नाही, तर महापालिकेच्या महसुलाचेही मोठे नुकसान होत असल्याचा आरोप बागुल यांनी केला आहे. सार्वजनिक जागांचा वापर करून कंपन्या मोठ्या प्रमाणात व्यावसायिक फायदा मिळवत असतील, तर त्यासाठी महापालिकेचे शुल्क आणि दंड भरण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. त्यामुळे केवळ अनधिकृत बॅनर काढून टाकण्याची जुजबी कारवाई करून प्रशासनाने मोकळे होऊ नये, अशी भूमिका युवा सेनेने घेतली आहे.

“बॅनर लावला, तो काढला आणि प्रकरण संपले, अशी दिखाऊ कारवाई आता चालणार नाही. संबंधित जाहिरातदार, कंपनी आणि जबाबदार व्यक्तींवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करून संपूर्ण शुल्क आणि दंड वसूल केला पाहिजे,” अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

धोकादायक होर्डिंग्जमुळे जीवितहानी झाली तर जबाबदार कोण?

शहरातील काही ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर आणि होर्डिंग्ज नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक ठरू शकतात. रस्त्यालगत, चौकांमध्ये किंवा वाहतुकीच्या मार्गांवर नियमबाह्य पद्धतीने उभारलेले फलक वाहनचालकांचे लक्ष विचलित करू शकतात तसेच अपघाताचा धोका निर्माण करू शकतात.

वादळी वारे, मुसळधार पाऊस किंवा इतर नैसर्गिक परिस्थितीत कमकुवत अथवा नियमबाह्य जाहिरात फलक कोसळल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. अशा दुर्घटनेत एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवालही युवा सेनेने प्रशासनाला केला आहे.

“दुजाभाव खपवून घेणार नाही”

पुणेकरांच्या गणेशोत्सवातील मंडळे, नागरिक आणि आयोजकांवर नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. मात्र त्याच शहरातील सार्वजनिक जागांवर व्यावसायिक कंपन्यांकडून नियमबाह्य जाहिरातबाजी सुरू असताना प्रशासन दुर्लक्ष करत असेल, तर हा स्पष्ट दुजाभाव असल्याचे बागुल यांनी म्हटले आहे.

“पुणेकरांच्या उत्सवावर नियमांचा अंकुश आणि कंपन्यांच्या जाहिरातींवर प्रशासनाचे मौन — हा दुजाभाव आम्ही खपवून घेणार नाही,” असा इशारा युवा सेनेने दिला आहे.

कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा

महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन शहरातील अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज आणि जाहिरातींचे सर्वेक्षण करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करावी तसेच महापालिकेचे नुकसान झाले असल्यास संबंधितांकडून संपूर्ण शुल्क वसूल करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास युवा सेना स्वतः अनधिकृत जाहिरातबाजीची ठिकाणे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देईल आणि गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा हेमंत बागुल यांनी दिला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात पुण्याच्या रस्त्यांवर भक्तीचा उत्सव दिसावा की व्यावसायिक जाहिरातींचा बाजार, असा सवाल उपस्थित करत शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या बेकायदेशीर बॅनरविरोधात युवा सेना आक्रमक भूमिका घेणार असल्याचे बागुल यांनी स्पष्ट केले आहे.

You may have missed