Lingayat Samaj – Basav Jyoti | भक्तिपूर्ण वातावरणात पुण्यात ‘बसव ज्योती’ कार्यक्रम संपन्न ! ‘इष्टलिंग शिवयोग साधनेने आध्यात्मिक उन्नती साध्य’; स्वामी बसव देवरू यांचे प्रतिपादन

Lingayat Samaj - Basav Jyoti | 'Basav Jyoti' program concluded in a devotional atmosphere in Pune! 'Achieving Spiritual Elevation through Ishtaling Shiva Yoga Sadhana'; Assertion by Swami Basava Devaru

पुणे : Lingayat Samaj – Basav Jyoti |  इष्टलिंगाच्या माध्यमातून केलेल्या शिवयोग साधनेने मनःशांती लाभून आध्यात्मिक उन्नती साध्य होऊ शकते. त्यासाठी नित्य शिवयोग करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन अनुभव मंटप, बसवकल्याण येथील स्वामी बसव देवरू यांनी केले.

लिंगायत समाजाचे धर्म गुरू महात्मा बसवण्णांनी बाराव्या शतकात सकल सजीव सृष्टीचे कल्याण सामावलेले असे लिंगायत तत्त्वज्ञान समाजाला दिले. त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पुण्यातील लिंगायत समाजातर्फे श्रावण महिन्यात दरवर्षी ‘ बसव ज्योती ‘ या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील अशाच कार्यक्रमाचे आयोजन शहराच्या विविध भागात करण्यात आले होते. बसव कल्याण येथील परीस कट्टा येथून प्रार्थना, पूजा करून स्वामी बसव देवरू ज्योती घेऊन पुण्यात आले होते. संपूर्ण महिनाभर शहराच्या विविध ठिकाणी बसव ज्योती पूजन, प्रवचन, इष्टलिंग दीक्षा असे विविध कार्यक्रम अत्यंत उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाले. श्रावण महिन्याच्या अखेरीस वडगाव बुद्रुक येथील जैन मंदिरात भव्य असा सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्वामी बसव देवरू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बसव पीठावर स्वामी बसव देवरू, स्वामी संगमेश्वर शिवाचार्य गोड्याळ, शरण मल्लिकार्जुन मुलगे, प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. अनिल दुधभाते उपस्थित होते.

स्वामी बसव देवरू म्हणाले की, सृष्टीच्या चराचरात चैतन्यरूपी शिव सामावलेला आहे. त्या परशिवरूपी परमात्म्याशी एकरूप होणे हेच जीवनाचे अंतिम ध्येय असावे. संसारात राहून देखील इष्टलिंगाच्या माध्यमातून शिवयोग साधनेद्वारे एकरूप होता येऊ शकते. स्वतःच्या अंतरंगाचा विकास करून चिरंतन आनंद आणि आत्मसुखाची प्राप्ती करता येऊ शकते. त्यासाठी गुरूकडून इष्टलिंग दीक्षा घेऊन शिवयोगाचे योग्य ज्ञान आत्मसात करून नित्य साधना करणे गरजेचे आहे. असे ही स्वामी बसव देवरू यांनी नमूद केले.

यावेळी स्वामी संगमेश्वर शिवाचार्य गोड्याळ यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमात लिंगायत समाजातर्फे स्वामी बसव देवरू, स्वामी संगमेश्वर शिवाचार्य गोड्याळ यांचा सन्मान करण्यात आला. शरण मल्लिकार्जुन मुलगे यांनी संपूर्ण श्रावण महिना मौन अनुष्ठान केले होते. यावेळी त्यांनी अनुष्ठानाची समाप्ती केली. स्वामी बसव देवरू यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

You may have missed