Pune Cyber Crime News | ‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने महिलेची 6.75 लाखांची फसवणूक; सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा
पुणे : Pune Cyber Crime News | घरबसल्या ऑनलाइन काम करून चांगला परतावा मिळवण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी एका महिलेची 6 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाईल क्रमांकावर घरातून ऑनलाइन पद्धतीने काम करण्याची संधी असल्याचा संदेश पाठविला होता. संदेशावर विश्वास ठेवून महिलेने त्यामध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला.
यानंतर चोरट्यांनी ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास चांगला मोबदला मिळेल, असे सांगून महिलेला विश्वासात घेतले. सुरुवातीला तिला एक टास्क देण्यात आला. तो पूर्ण केल्यानंतर त्याचे पैसे तिच्या बँक खात्यात जमा झाल्याचे भासविण्यात आले.
यामुळे महिलेचा विश्वास बसल्यानंतर चोरट्यांनी या कामात अधिक रक्कम गुंतवल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानुसार महिलेने वेळोवेळी चोरट्यांनी सांगितलेल्या खात्यांमध्ये पैसे जमा केले.
अशाप्रकारे तिच्याकडून एकूण 6 लाख 75 हजार रुपये घेतल्यानंतर परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नऱ्हे पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
