Pune Festival 2026 | 38 व्या पुणे फेस्टिव्हलच्या ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते; कैद्यांनी साकारलेल्या गणेशमूर्तीची विशेष निवड

Pune Festival 2026

पुणे : Pune Festival 2026 |  38 व्या पुणे फेस्टिव्हलच्या ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना सोमवार, 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम येथे होणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी आणि त्यांच्या पत्नी डॉ. अनुश्री चौधरी यांच्या हस्ते गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. वेदमूर्ती पं. धनंजय घाटे गुरुजी पौरोहित्य करणार आहेत.

यंदाच्या पुणे फेस्टिव्हलसाठी एक विशेष बाब म्हणजे कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या गणेशमूर्तीची निवड करण्यात आली आहे.

कारागृहातील बंदींना गुन्हेगारीच्या प्रवाहातून बाहेर काढून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणे या उद्देशाने महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान पुणे आणि आदर्श मित्र मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दहा वर्षांपासून ‘प्रेरणापथ’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत बंदींना जगप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर आणि विराज खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणातून 100 हून अधिक बंदी बांधवांनी 300 पेक्षा अधिक गणेशमूर्ती तयार केल्या आहेत.

या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी प्रकल्पाला भेट देत पुणे फेस्टिव्हलसाठी बंदींनी बनविलेली एक गणेशमूर्ती निवडली.

“बंदी बांधवांच्या सुधारणेच्या वाटचालीला पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे,” असे कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले.

‘प्रेरणापथ’ प्रकल्पाच्या समन्वयामध्ये महाराष्ट्र कारागृह प्रशासनाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके, पोलीस महानिरीक्षक योगेश देसाई, कारागृह अधीक्षक सुनील धमाळ, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद भोई आणि आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप यांचा सहभाग आहे.

You may have missed