Pune Cyber Crime News | शेअर बाजारातील मोठ्या परताव्याचे आमिष; ज्येष्ठ महिलेची लाखोंची सायबर फसवणूक
पुणे : Pune Cyber Crime News | समाजमाध्यमावर शेअर बाजारातील गुंतवणुकीची जाहिरात पाहून मोठ्या परताव्याच्या आमिषाला बळी पडलेल्या 65 वर्षीय महिलेची सायबर चोरट्यांनी लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, गुंतवणुकीसाठी महिलेने दागिने मोडून पैसे उभे केले होते. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला वारजे परिसरातील अतुलनगर येथे राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 सप्टेंबर रोजी त्यांच्या मैत्रिणीने समाजमाध्यमावर शेअर बाजारातील गुंतवणुकीशी संबंधित जाहिरात पाहिली होती. या जाहिरातीत गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले होते.
महिलेच्या मैत्रिणीने जाहिरातीत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तिला एक ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यास सांगितले. सुरुवातीला काही रक्कम संबंधित खात्यात जमा केल्यानंतर ॲपमध्ये गुंतवणुकीवर मोठा नफा झाल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे तिचा विश्वास बसला.
यानंतर आणखी रक्कम गुंतवल्यास अधिक मोठा परतावा मिळेल, असे सांगून चोरट्यांनी तिला जाळ्यात ओढले. मैत्रिणीकडे पुरेसे पैसे नसल्याने तिने तक्रारदार ज्येष्ठ महिलेकडे मदत मागितली.
त्यानंतर तक्रारदार महिलेने शहरातील एका नामांकित सराफी पेढीत जाऊन दागिने मोडले आणि सुमारे नऊ लाख रुपये मैत्रिणीला दिले. ही रक्कम ऑनलाइन पद्धतीने सायबर चोरट्यांनी सांगितलेल्या खात्यात जमा करण्यात आली.
रक्कम जमा झाल्यानंतर ॲपमध्ये गुंतवणुकीवर तब्बल 74 लाख रुपयांचा परतावा मिळाल्याचे दाखविण्यात आले. मात्र, ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता व्यवहार पूर्ण झाला नाही.
याबाबत संबंधित मोबाइल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर आरोपींनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. गुंतवणुकीची मूळ रक्कम किंवा दाखविण्यात आलेला परतावा मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान करीत आहेत.
