Maharashtra Weather Alert | राज्यात हवामानाचा दुहेरी तडाखा; विदर्भात उष्णतेची लाट तर दक्षिण महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Weather

पुणे :   Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रातील हवामानात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून, भारतीय हवामान विभागाने आज, २३ एप्रिल रोजी राज्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. एका बाजूला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा कडाका वाढला असून, अकोला, अमरावती आणि जळगाव यांसारख्या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पार गेल्याने तिथे तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला, अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील वातावरणात कमालीचा बदल झाला आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात उन्हाच्या झळांसोबतच आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. याच काळात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मराठवाड्यातील काही भागांतही ढगाळ हवामान राहणार असून, दुपारनंतर तिथेही पावसाच्या सरी कोसळू शकतात. नागरिकांनी उन्हाच्या तीव्रतेपासून स्वतःचा बचाव करावा आणि पावसाच्या वेळी झाडांखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वाढत्या उन्हामुळे आणि अचानक येणाऱ्या पावसामुळे शेतीकामांवरही परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.

You may have missed