Pune Crime News | 10 वी पास असलेल्याने इस्त्रो सायंटिस्ट असल्याचे सांगून मॅट्रोमोनिअल वेबसाईटवरुन महिलेची 26 लाखांची फसवणूक; तोतया जाळ्यात, महिलांची फसवणूक केल्याचे तब्बल 11 गुन्हे दाखल
पुणे : Pune Crime News | तो १० वी पास असताना आपण इस्त्रो सायंटिस्ट असल्याचे सांगून मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर फेक प्रोफाईल अकाऊंट बनवून महिलेची २६ लाखांची फसवणूक करणार्या तोतयाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने आतापर्यंत अशाच प्रकारे महिलांची फसवणूक केल्याचे ११ गुन्हे दाखल आहेत.
आदर्श प्रशांत म्हात्रे ऊर्फ स्वप्नील वारुळे ऊर्फ हेमंत गायकर ऊर्फ जयेश पाटील Adarsh Prashant Mhatre alias Swapnil Warule alias Hemant Gaiker alias Jayesh Patil (वय ३४, रा. अलीबाग, जि. रायगड) असे या तोतयाचे नाव आहे. त्याला कॅसिनोचा नाद असून तो गोव्यातील एका कॅसिनोचा गोल्ड कार्ड मेंबर आहे. फसवणूक केलेले २१ लाख रुपये त्याने या कॅसिनोच्या खात्यात भरले होते. येरवडा पोलिसांनी हे २१ लाख रुपये जप्त केले आहेत.
आदर्श म्हात्रे याने मेट्रोमोनिअल वेबसाईटवर इस्त्रो सायंटिस्ट असल्याचे बनावट प्रोफाइल अकाऊंट बनविले. त्याद्वारे त्याने लग्नासाठी महिलेला मागणी घातली. महिलेच्या मुलीच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मुलीच्या शिक्षणासाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगून, त्यांना लोन घेण्यास भाग पाडले. त्यांची एकूण २६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली होती. येरवडा पोलीस ठाण्यात १० जानेवारी २०२६ रोजी हा गुन्हा दाखल झाला होता.
आदर्श म्हात्रे याचा शोध घेत असताना त्याच्यावर तुर्भ, रसायनी, पनवेल, रबाळे पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले. नवी मुंबईतील रबाळे पोलिसांनी त्याला २६ फेब्रवारी २०२६ रोजी अटक केल्याचे दिसून आले. न्यायालयाची परवागनी घेऊन येरवडा पोलिसांनी १५ एप्रिल २०२६ रोजी त्याला अटक केली.
याबाबत येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी सांगितले की, आदर्श म्हात्रे हा केवळ १० वी झालेला आहे. तो एका कन्स्ट्रक्शन कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होता. लग्न करण्याच्या हेतूने त्याने मॅट्रोमोनिअल साईटवर आपले नाव नोंदविले. त्यावेळी त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. त्यातून त्याने वेगवेगळ्या मेट्रोमोनिअल साईटवर बनावट नावाने फेक अकाऊंट तयार केले. यावरील विधवा तसेच वय झालेल्या महिलांना टारगेट केले. त्यांची ओळख वाढवून लग्नाची मागणी तो घालत असे. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून तो त्यांच्याकडून पैसे उकळत असे.
या फसवणूकीतून आलेल्या पैशातून तो गोव्याला मौजमजा करण्यासाठी जात असे. त्यातूनच तो तेथील बिग डॅडी कॅसिनोचा गोल्ड कार्ड मेंबर बनला आहे. त्याने या महिलेकडून घेतलेल्या पैशांपैकी २१ लाख रुपये या बिग डॅडी कॅसिनोमधील खात्यात टाकले होते. कॅसिनोमध्ये खेळताना त्याला ५ लाख रुपये फायदा झाला होता. तो त्याने शेअर मार्केटमध्ये फायदा झाल्याचे सांगून परत करुन विश्वास संपादन केला होता. एका महिलेकडून घेतलेले पैसे तो दुसर्या महिलेला देऊन तिचा विश्वास संपादन करुन त्यांची फसवणूक करत असे. त्याच्याविरुद्ध मुंबई, नवी मुंबई परिसरातील विविध पोलीस ठाण्यात ११ गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय ठकार अधिक तपास करीत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमूला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनिल जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय ठकार यांच्या सुचनेनुसार, सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जºहाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, पोलीस अंमलदार पिलाने, स्वप्नील पिंगळे, भागवत, औदुंबर घटकळ यांनी केली आहे.
