Maval Pune Crime News | मावळ तालुक्यातील बंटी-बबली, जमीन खरेदीच्या बहाण्याने 26 लाखांची फसवणूक; शिरगाव पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल
मावळ : Maval Pune Crime News | मावळ तालुक्यातील आढले खुर्द येथे जमीन देण्याच्या बहाण्याने एका रिअल इस्टेट व्यावसायिकाची २६ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अशाच प्रकारे अन्य कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याप्रकरणी संजय पांडुरंग नरोडे (वय ५५, रा. औंध, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून मोहन जयवंत येवले आणि आशा मोहन येवले (रा. आढले खुर्द, ता. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हनुमंत पारखे करत आहेत.
ही घटना ऑक्टोबर २०२० ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत घडली. फिर्यादी नरोडे आणि आरोपी यांच्यात आढले खुर्द येथे १५ हजार चौरस फूट जागेबाबत सामंजस्य करार झाला होता. या व्यवहारापोटी आरोपी आशा येवले यांच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे २० लाख रुपये आणि मोहन येवले यांना रोख सहा लाख रुपये असे एकूण २६ लाख रुपये फिर्यादींनी दिले होते. मात्र, पैसे घेऊनही आरोपींनी जमिनीचे खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ केली.
नेमकी घटना काय?
आरोपींनी फिर्यादी नरोडे यांना आढले खुर्द येथील गट क्र. २५५ मधील १५,००० चौ. फूट जागा विक्री करण्याचे आमिष दाखवले होते. ऑक्टोबर २०२० मध्ये हा व्यवहार ठरला होता. यासाठी आरोपींनी नरोडे यांच्याकडून वेळोवेळी आरटीजीएस (RTGS) द्वारे २० लाख रुपये आणि रोख ६ लाख रुपये, असे एकूण २६ लाख रुपये स्वीकारले. मात्र, पैसे घेऊनही आरोपींनी जागेचा ताबा दिला नाही किंवा खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ केली.फिर्यादी यांनी पैशांचा तगादा लावला असता, आरोपींनी त्यांना दमदाटी व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नरोडे यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
