Pune Crime News | हातचलाखी करुन सातार्यात महिलेची फसवणूक करणार्या सराईत चोरट्याच्या शिवाजीनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पुणे : Pune Crime News | सातारा येथील प्रतापगंजमधील आयडीबीआय बँकेत हातचलाखी करुन महिलेची फसवणूक करुन ७ हजार रुपये चोरुन नेणार्या सराईत चोरट्याच्या शिवाजीनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
इब्राहिम बाबु इराणी Ibrahim Babu Irani (रा. इराणी वस्ती, शिवाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
सातारा येथील प्रतापगंज पेठ येथील आय डी बी आय बँकेत वृद्ध महिलेकडे असलेली रोख रक्कम मोजून देतो, असे सांगून हातचलाखी करुन त्यातील ७ हजार रुपये चोरट्याने चोरुन नेले होते. २७ मार्च २०२६ रोजी ही घटना घडली होती. शाहुपुरी पोलिसांनी त्याचे सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र पाठविले होते. पोलिसांच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर हे फुटेज मिळाले होते. शिवाजीनगर पोलीस पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार महेंद्र कडु यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सातारा येथील बँकेत हातचलाखी करणारा चोरटा हा इब्राहिम इराणी आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीच्या घरी जाऊन शोध घेतला असता तो मिळून आला. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. इब्राहिम इराणी याला शाहुपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश कुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस हवालदार संतोष मेमाणे, पोलीस नाईक सचिन जाधव, पोलीस अंमलदार महेंद्र कडु, रोहित झांबरे यांनी केली आहे.
