Navneet Rana | राज्यसभेसाठी नवनीत राणा मैदानात? सुनेत्रा पवारांच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट
मुंबई : Navneet Rana | महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभेच्या पोटनिवडणुकीवरून पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर आता अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी दावा ठोकल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नवनीत राणा या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असून, त्यांनी महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांची, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नवनीत राणा या थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून किंवा भाजपच्या कोट्यातून या जागेसाठी फील्डिंग लावत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, माजी खासदार नवनीत राणा यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्याबाबत पक्षात कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. त्यामुळे नवनीत राणा यांच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादीतून राज्यसभेवर जाण्यासाठी अनेकजण उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे.
