October Heat In Pune | पुण्यात पारा 35.7 अंशांवर; दिवसभर उन्हाचा तडाखा, 2002 नंतर ऑक्टोबरमधील सर्वाधिक तापमान
पुणे : October Heat In Pune | शहरात ऑक्टोबरच्या उन्हाचा चटका वाढला असून मंगळवारी शिवाजीनगर येथे कमाल तापमान 35.7 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर किमान तापमान 21.8 अंश सेल्सिअस होते.
पावसाने उघडीप दिल्यानंतर आणि आकाश निरभ्र राहिल्याने शहरातील उन्हाची तीव्रता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत असून दुपारच्या वेळी उकाड्यामुळे नागरिक हैराण होत आहेत.
शहरातील इतर भागांतही तापमानाचा पारा चढलेला दिसून आला. लोहगाव येथे 36.6 अंश, चिंचवडमध्ये 35.5 अंश, तर पाषाण येथे 34.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पुण्यासह राज्यातील अनेक भागांत उष्ण आणि प्रामुख्याने कोरडे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.
राज्यात अमरावती येथे सर्वाधिक 39.6 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले. मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही तापमान सरासरीपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले.
