PM Modi Birthday In Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एसएनडीटी मेट्रो स्थानकावर दिवाळीचा उत्साह ! हजारो दिव्यांनी उजळला मेट्रो स्थानकाचा परिसर; चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती
PM Modi Birthday In Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड भाजपच्या वतीने एसएनडीटी मेट्रो स्थानक परिसरात दिवे प्रज्वलित करून दिवाळीचा उत्साह साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांनी संपूर्ण मेट्रो स्थानक परिसर उजळून निघाला होता. यावेळी “मोदीजी, आप देश का विकास करो, हम आपके साथ हैं!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजप पुणे शहर सरचिटणीस आणि सेवा पर्व संयोजक सुशील मेंगडे, भाजप दक्षिण मंडल अध्यक्ष गिरीश खत्री, उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर ‘सेवा पर्व’ साजरे करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशभरात उभारलेल्या विविध विकास प्रकल्पांच्या परिसरात कार्यकर्त्यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून भाजप कोथरुड मंडलाच्या वतीने एसएनडीटी मेट्रो स्थानक परिसरात हजारो दिवे प्रज्वलित करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मेट्रो स्थानकाचा संपूर्ण परिसर दीपप्रकाशाने उजळून निघाला.
यावेळी ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश झपाट्याने प्रगती करत आहे. त्यांच्या नेतृत्वात अनेक महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांना गती मिळाली असून, विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले आहे. त्यांच्या गतिमान कार्यपद्धतीमुळे देशाच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, मेट्रो प्रवासी देखील या आनंदोत्सवात मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
