Flight Ticket Prices | सणासुदीत विमान प्रवास महागला ! तिकीट दरांत 40 टक्क्यांहून अधिक वाढ; पुणे-दिल्ली, बंगळुरू आणि दुबईच्या प्रवाशांना मोठा आर्थिक फटका

Flight Ticket Prices | Air travel becomes costlier during the festive season! Ticket rates have risen by over 40%; travelers on Pune-Delhi, Bengaluru, and Dubai routes face a major financial hit.

पुणे : Flight Ticket Prices | दिवाळी आणि छटपूजेच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवासाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने पुणेकरांच्या प्रवासाचे आर्थिक गणित बिघडले आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान मार्गांवरील तिकीट दरांत मोठी वाढ झाली असून, काही मार्गांवर प्रवाशांना पूर्वीच्या तुलनेत ४० टक्क्यांहून अधिक रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांनी प्रवास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे ते बंगळुरू, दिल्ली, चेन्नई, कोलकता तसेच दुबई या प्रमुख मार्गांवरील विमान तिकिटांचे दर वाढले आहेत. सणासुदीच्या काळात गावी जाणारे विद्यार्थी, आयटी कर्मचारी तसेच पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या कुटुंबांना या भाडेवाढीचा फटका बसत आहे.

विमान इंधन महागल्याने तिकीट दरांचा भडका

पश्चिम आशियातील संघर्षामुळे विमान इंधनाच्या (एटीएफ) किमती वाढल्या आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांच्या परिचालन खर्चात वाढ झाली असून, त्याचा भार प्रवाशांवर पडत आहे.

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने ९ ऑक्टोबरपासून नवीन बुकिंगसाठी सुधारित इंधन अधिभार लागू केला आहे. इंडिगोनेही ६ ऑक्टोबरपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवरील अंतरानुसार आकारण्यात येणाऱ्या इंधन शुल्कात वाढ केली आहे.

त्याचबरोबर दिवाळी आणि उत्तर भारतातील छटपूजेसाठी प्रवाशांची वाढती मागणी हेही विमान तिकिटांचे दर वाढण्यामागील प्रमुख कारण ठरत आहे.

पुणे-बंगळुरूचे तिकीट १० हजारांवर; दिल्लीसाठी २२ हजारांपर्यंत मोजावे लागणार

पूर्वी पुणे ते बंगळुरू या मार्गावरील एकेरी तिकीट साधारण पाच हजार रुपयांत मिळत होते. मात्र, ऑक्टोबरमधील काही तारखांसाठी आता आठ ते दहा हजार रुपये मोजावे लागत असल्याचे समोर आले आहे.

पुणे ते दिल्ली एकेरी प्रवासासाठी नऊ ते दहा हजार रुपये खर्च येत असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात काही तिकिटांचे दर १६ ते २२ हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता अहवालातील दरांवरून दिसून येते.

पुणे ते दुबई विमान प्रवासासाठी पूर्वी १२ ते १५ हजार रुपये मोजावे लागत होते. आता काही तारखांसाठी हे दर २० ते २२ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

तसेच, पुणे ते बागडोगरा या मार्गावरील येण्या-जाण्याचे तिकीट पूर्वी सुमारे १५ हजार रुपयांत मिळत होते. आता त्यासाठी २० हजार रुपयांहून अधिक खर्च येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्पाइसजेटची पुणे-दुबई सेवा तात्पुरती बंद

दरम्यान, स्पाइसजेटची पुणे-दुबई विमानसेवा तात्पुरती बंद असल्याचे वृत्त आहे. ही सेवा ऑक्टोबरच्या मध्यापासून पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे.

प्रमुख मार्गांवरील विमान तिकीट दर

विमान मार्ग सध्याचे दर नोव्हेंबरचा पहिला आठवडा
पुणे–बंगळुरू ₹५,०००–₹८,००० ₹८,०००–₹१२,०००
पुणे–दिल्ली ₹७,०००–₹१०,००० ₹१६,०००–₹२२,०००
पुणे–चेन्नई ₹६,०००–₹१०,००० ₹७,०००–₹११,०००
पुणे–कोलकता ₹१३,०००–₹१५,००० ₹१५,०००–₹१८,०००
दुबई–पुणे ₹१२,०००–₹१५,००० ₹१७,०००–₹२२,०००

वाढत्या विमान भाड्यांमुळे सणासुदीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. परिणामी, काही जण प्रवास पुढे ढकलत आहेत, तर काही जण स्वस्त तिकिटांच्या प्रतीक्षेत आहेत.

You may have missed