Pune Crime News | पुण्यात २ कोटी २० लाखांच्या घरफोडीचा अवघ्या १२ तासांत छडा! एकाच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या ‘की मेकर’ने काकाच्या मदतीने चोरले २ किलो २०० ग्रॅम सोने; खडक पोलिसांकडून १०० टक्के मुद्देमाल जप्त
पुणे : Pune Crime News | सोन्याचे दागिने घडविणाऱ्या कारागिराच्या बंद घराचे कुलूप तोडून तब्बल २ कोटी २० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि सोन्याची बिस्किटे चोरणाऱ्या दोन आरोपींना खडक पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली आहे. विशेष म्हणजे, आरोपी हे फिर्यादी राहत असलेल्या इमारतीतच राहत होते. त्यापैकी एकजण चावी बनविण्याचे काम करत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला असून, त्याव्यतिरिक्त आणखी ४६ ग्रॅम सोने जप्त केले आहे.
मुस्तफा नजीर शेख Mustafa Nazir Shaikh (वय ३६) आणि सरफराज ऊर्फ आवेज मैन्नुद्दीन शेख Sarfraz alias Aweez Mainuddin Shaikh (वय २२, दोघे रा. रविवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मुस्तफा याचे भंगाराचे दुकान असून, सरफराज हा चावी बनविण्याचे काम करतो. दोघेही नात्याने काका-पुतणे आहेत. याप्रकरणी मोहम्मद तौफिक रज्जाक खान (वय ३६, रा. केएनजी कॉम्प्लेक्स, रविवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बंद घराचे कुलूप तोडून २ कोटी २० लाखांचे सोने लंपास
फिर्यादी खान यांचे रविवार पेठ परिसरात ‘नाईस कास्टिंग अँड गोल्ड स्मिथ’ नावाचे सोन्या-चांदीचे दागिने बनविण्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात सहा कामगार असून, परिसरातील विविध सराफ व्यावसायिकांकडून ते दागिने तयार करण्याच्या ऑर्डर घेतात.
दागिने बनविण्यासाठी सराफांकडून मिळणारे सोने तसेच स्वतःच्या कुटुंबातील दागिने सुरक्षिततेच्या कारणास्तव ते घरातील लोखंडी कपाटात ठेवत असत.
१० ऑक्टोबर रोजी सायंकाळी खान यांच्या पत्नी घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. हीच संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले आणि कपाटातील तब्बल २ किलो २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व बिस्किटे चोरून नेली. या ऐवजाची किंमत सुमारे २ कोटी २० लाख रुपये होती.
सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्वाचा धागा; संशयित निघाले त्याच इमारतीतील रहिवासी
या गुन्ह्याचा तपास करताना खडक पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाची बारकाईने पाहणी केली. पोलीस अंमलदार हेमंत पेरणे, अमित जमदाडे, मयूर भोसले आणि सैफ नदाफ यांना फिर्यादींच्या इमारतीखाली दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या घुटमळताना दिसून आल्या.
पोलिसांनी या दोघांची गोपनीय माहिती मिळवून त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले. तपासादरम्यान दोघेही फिर्यादी राहत असलेल्या इमारतीतच वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
चोरीचा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत; अतिरिक्त ४६ ग्रॅम सोनेही जप्त
खडक पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेले संपूर्ण २ किलो २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सोन्याची बिस्किटे हस्तगत केली आहेत. याशिवाय आणखी ४६ ग्रॅम सोने पोलिसांच्या हाती लागले आहे.
अवघ्या १२ तासांत आरोपींना अटक करून चोरीला गेलेला संपूर्ण ऐवज जप्त करण्यात पोलिसांना यश आले.
घरावर आधीपासून पाळत; चावी बनविण्याच्या कामाचा फायदा घेत घरफोडीचा कट
पोलिसांच्या तपासानुसार, मुस्तफा आणि सरफराज यांना फिर्यादी हे सोन्याचे कारागीर असल्याची माहिती होती. त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने आणि बिस्किटे असल्याचेही दोघांना माहीत होते.
सरफराज हा चावी बनविण्याचे काम करत असल्याने दोघांनी मिळून घरफोडीचा कट रचल्याचा आरोप आहे. यासाठी त्यांनी खान यांच्या घरावर पाळत ठेवली होती.
१० ऑक्टोबर रोजी घराला कुलूप असल्याचे लक्षात येताच त्यांनी संधी साधून चोरी केल्याचे तपासातून समोर आले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे, जयसिंग दाढे, अशोक खाडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष मोहिते, विनोद शिंदे तसेच पोलीस अंमलदार मयूर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, नीलेश साबळे, विकास पांडोळे, सैफ नदाफ, उमेश मठपती आणि सागर कुडले यांच्या पथकाने केली.
