Pune ACB Trap Case | पुणे पोलिसांना झाले तरी काय? 5 लाख रुपयांची लाच घेतल्यानंतर आणखी 1.5 लाख रुपये घेताना पोलीस हवालदाराला ACB ने पकडले
पुणे : Pune ACB Trap Case | पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे भ्रष्ट्राचार, हप्ते वसुलीबाबत अतिशय कडक असतानाच आठवड्याच्या आत लाच घेताना तिसर्या पोलिसाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले आहे. चेक बाऊंस प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट न बजावण्यासाठी अगोदर ५ लाख रुपयांची लाच घेतली असताना पुन्हा नव्याने वॉरंट परत आले असल्याचे सांगून अटक न करण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच मागून दीड लाख रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला सापळा रचून पकडले.
गणेश शहाजी कस्पटे Ganesh Shahaji Kaspate (वय ४०, रा. शंकर सुमन हाईटस, भेकराईनगर, फुरसुंगी) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
पुणे पोलीस दलातील खंडणीखोर पोलीस उपनिरीक्षकासह तिघांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याची कारवाई मंगळवारी करण्यात आली होती. त्या अगोदर आदल्या दिवशी सोमवारी लाचखोर सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार व पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे यांना निलंबित केले होते. त्यानंतर आता हा तिसरा प्रकार समोर आला आहे.
तक्रारदार हे काम करीत असणार्या कंपनीच्या मालकाविरुद्ध हैदराबाद कोर्टामध्ये चेक बाऊन्सची केस चालू होती. त्या केसमध्ये तक्रारदारांचे मालकास नॉन बेलेबल वॉरंट निघालेले होते. त्याची बजावणी न करण्यासाठी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गणेश कस्पटे याने यापूर्वी ३ मार्च २०२६ रोजी तक्रारदारांच्या मालकाकडून ५ लाख रुपयांची लाचेची मागणी करुन ते पैसे स्वीकारलेले होते. पुन्हा १ मे रोजी पोलीस हवालदार गणेश कस्पटे याने हे वॉरंट परत आले असल्याचे सांगून तक्रारदार यांच्या मालकांकडे अटक न करण्यासाठी व मदत करण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांचे मालक आजारी असल्याने तक्रारदार हे पोलीस हवालदार गणेश कस्पटे याला भेटले.
त्याने तक्रारदाराच्या मालकांचे हैदराबाद कोर्टाचे नॉन बेलेबल वॉरंट मध्ये अटक न करण्यासाठी व मदत करण्यासाठी स्वत:साठी अडीच लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २ लाख रुपये लाचेची मागणी केली असल्याची तक्रार ५ मे रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्याच दिवशी याची पडताळणी केली. त्यात गणेश कस्पटे याने यापूर्वी मालकाना अटक न करण्यासाठी व मदत करण्यासाठी ५ लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य करुन २ लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती दीड लाख रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बोट क्लब रोडवरील सुलक्स कल्पतरु गार्डन सोसायटीसमोर, पानटपरीजवळ सापळा रचला. बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराकडून दीड लाख रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
गणेश कस्पटे याला ताब्यात घेताना त्याने तक्रारदार यांच्या छातीस चावा घेतला आहे. सापळा पथकास धक्काबुक्की करुन शासकीय कामात अडथळा आणत पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर व सहकारी यांनी केली आहे़ सहायक पोलीस आयुक्त भारती मोरे तपास करीत आहेत.
