Pune ACB Trap | पावसात जमीन वाहुन गेली, वर वन विभागाचा जाच! माती भराव करणार्या शेतकर्याकडून लाच घेताना वनपाल जेरबंद
पुणे : Pune ACB Trap | पावसाळ्यात शेतातील माती पावसामुळे नीरा नदीत वाहून गेली. तेव्हा शेतकरी नदीपात्रातील माती शेतात टाकत असताना त्याचा मज्जाव करुन कारवाईची भिती दाखवुन लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वनपालाला रंगेहाथ पकडले.
जहीर सिराज शेख (वय ४७, रा. निशिका अपार्टमेंट, जळुची रोड, जिजाऊ मंगल कार्यालयाशेजारी, बारामती) असे या वनपालाचे नाव आहे. बारामतीमधील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात करंज राऊंड ऑफिसर म्हणून त्याची नेमणूक आहे.
तक्रारदार यांची बारामतीमधील कोर्हाळे खुर्द येथे ४ हेक्टर शेत जमीन आहे. या शेतातील माती पावसामुळे नीरा नदीत वाहून गेली होती़ म्हणून ते नदीपात्रातील माती शेतात टाकत होते. त्यावेळी वनपाल जहीर शेख याने २६ सप्टेंबर २०२६ रोजी तक्रारदाराचे काम बंद करुन ही जागा वन विभागाच्या मालकीची असल्याचे सांगितले. तक्रारदार यांच्यावर कारवाई करण्याची भीती घालून माती भराव करण्यास मज्जाव केला होता. त्यावेळी तक्रारदार यांनी कारवाई न करता काम बंद न पाडण्याची विनंती केली. तेव्हा जहीर शेख याने कारवाई न करता काम सुरु ठेवण्याकरीता त्याच्या सहकारी भुमरे मॅडम व स्वत:साठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यापैकी ४ हजार रुपये त्याच दिवशी स्वीकारले होते. उर्वरित ६ हजार रुपये दिल्याशिवाय काम सुरु करु नका, असे बोलून लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराची तक्रार १४ ऑक्टोंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. या तक्रारीची पडताळणी २३ ऑक्टोंबर रोजी करण्यात आली. वनपाल जहीर शेख याने यापूर्वी ४ हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य करुन ६ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. लाच मागणीच्या अनुषंगाने २५ ऑक्टोंबर रोजी दुपारी माळेगाव येथील आय टी आयसमोरील हॉटेल शिवकृपा येथे सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ६ हजार रुपये स्वीकारताना वनपाल जहीर शेख याल पकडण्यात आले. माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन वनपाल जहीर शेख याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सतिश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील व सहकारी यांनी ही कारवाई केली आहे.
