Pune Accident News | पुणे : बोपदेव घाटात काळाचा घाला! बसथांब्यावर उभ्या विद्यार्थ्यांना टेम्पोने उडवले; तिघांचा मृत्यू, दोघे जखमी (Video)

Pune Accident News

कारला पाठीमागून धडक दिल्यानंतर टेम्पोवरील नियंत्रण सुटले; ट्रिनिटी कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू, चालक पोलिसांच्या ताब्यात

पुणे  : पुण्यातील बोपदेव घाटात बुधवारी दुपारी भीषण अपघाताची घटना घडली. घाटातून उताराने येणाऱ्या आयशर टेम्पोने कारला पाठीमागून धडक दिल्यानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या बसथांब्यावर उभ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना धडक दिली. या अपघातात ट्रिनिटी कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, अन्य दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

https://www.instagram.com/p/DgKiYkfpmjA

कारला धडक दिल्यानंतर टेम्पोवरील नियंत्रण सुटले

मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा बुद्रुक व येवलेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोपदेव घाटात बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. घाटातून उताराने येणाऱ्या आयशर टेम्पोने (MH 04 FD 7654) पुढे जात असलेल्या हुंडाई व्हेन्यू कारला (MH 12 YN 3247) पाठीमागून जोरदार धडक दिली.

या धडकेनंतर टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित टेम्पोने रस्त्याच्या बाजूला असलेल्या बसथांब्यावर उभ्या ट्रिनिटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना धडक दिली. या अपघातात पाच विद्यार्थी जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. मात्र, त्यापैकी तीन विद्यार्थ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृत विद्यार्थ्यांची नावे :

* सिद्धेश राजे – ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू.
* विशाल दांगडे – रुबी हॉल क्लिनिक, वानवडी येथे उपचारादरम्यान मृत्यू.
* मोहिनी चौधरी – भारती रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू.

जखमी विद्यार्थी :

* श्वेता तळेकर – रुबी हॉल क्लिनिक, वानवडी येथे उपचार सुरू.
* सोहम घंगाळे – इनामदार रुग्णालयात उपचार सुरू.

टेम्पोसह चालक पोलिसांच्या ताब्यात

अपघातास कारणीभूत ठरलेला आयशर टेम्पो आणि त्याच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास केला जात आहे.

बोपदेव घाटातील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

बसथांब्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातल्याने बोपदेव घाटातील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घाटातील मालवाहू वाहनांच्या वेगावर नियंत्रण, बसथांब्यांची सुरक्षितता आणि अपघात प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्याची गरज या दुर्घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.

तीन विद्यार्थ्यांच्या अकाली मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

You may have missed