Pune Crime Court News | गँगस्टर निलेश घायवळ प्रकरणात न्यायालयीन घडामोड; अमीर चौधरींना जेलमध्ये पाठवण्याच्या आदेशावर सत्र न्यायालयाची नोटीस
पुणे : Pune Crime Court News | गँगस्टर निलेश घायवळ प्रकरणात एक महत्त्वाची न्यायालयीन घडामोड समोर आली आहे. डीसीपी झोन-३ अंतर्गत विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांनी बीएनएसएस कलम 130 अंतर्गत अमीर हबिबुल्ला चौधरी यांना थेट कारागृहात पाठवण्याचा आदेश दिला होता. या आदेशाविरोधात दाखल करण्यात आलेल्या रिव्हिजन अर्जाची सत्र न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून, संबंधित प्राधिकरणाला नोटीस बजावली आहे.
अमीर चौधरी यांच्या वतीने ॲड. मिथुन चव्हाण (Adv Mithun Chavan) यांनी हा रिव्हिजन अर्ज दाखल केला आहे. या अर्जात संबंधित आदेश देताना कायदेशीर प्रक्रिया, नैसर्गिक न्यायाचे तत्त्व आणि भारतीय संविधानाने दिलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
कोणत्याही नागरिकाला पुरेशी सुनावणी न देता किंवा न्याय्य प्रक्रिया न पाळता थेट कारागृहात पाठवण्याचा अधिकार प्रशासनाला अमर्याद असू शकत नाही, असा महत्त्वाचा मुद्दा ॲड. चव्हाण यांनी न्यायालयासमोर मांडला.
प्राथमिक सुनावणीदरम्यान सत्र न्यायालयाने या प्रकरणातील काही गंभीर बाबींची नोंद घेतली. त्यानंतर विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशाची वैधता तपासण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता या आदेशावर सखोल न्यायालयीन परीक्षण होणार आहे.
या प्रकरणातील प्रशासनाची कारवाई कायद्याच्या चौकटीत होती की नाही, याबाबत पुढील सुनावणीत स्पष्टता येण्याची शक्यता आहे. कायदा क्षेत्रात या घडामोडीकडे विशेष लक्ष लागले आहे. कारण या प्रकरणाचा निकाल भविष्यात अशा प्रकारच्या प्रशासकीय आदेशांसाठी महत्त्वाचा संदर्भ ठरू शकतो.
न्यायालयाच्या या भूमिकेमुळे कायद्याच्या नावाखाली मनमानी आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांना आपल्या निर्णयाचे स्पष्टीकरण द्यावे लागेल, असा संदेश मिळाल्याची चर्चा सुरू आहे.
ही माहिती ॲड. मिथुन चव्हाण यांनी दिली आहे. या प्रकरणामुळे व्यक्तीस्वातंत्र्य, न्याय्य प्रक्रिया आणि कायद्याचे राज्य या मूलभूत तत्त्वांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
