Pune Crime Court News | पुणे : 15 कोटींच्या कथित फसवणूक प्रकरणात न्यायालयाचा निर्णय ! बिल्डर अशोक जैन यांच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नथुसिंग पुरोहित, सतीश राजपुरोहित, भगवानसिंग राजपुरोहित आणि प्रल्हादराम चौधरी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Pune Crime Court News | Pune: Court ruling in the alleged ₹15 crore fraud case! The court has rejected the bail applications of Nathusingh Purohit, Satish Rajpurohit, Bhagwansingh Rajpurohit, and Prahladram Chaudhary, who were arrested in connection with the death of builder Ashok Jain.

पुणे : Pune Crime Court News | बांधकाम व्यावसायिक अशोक जैन (Ashok Milapchand Jain) यांच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघा आरोपींचा जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. कथित आर्थिक फसवणूक, मृताच्या शरीरावरील जखमा, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आणि तपासाची गरज लक्षात घेता आरोपींना जामीन देता येणार नसल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. उदगांवकर यांनी आदेशात नमूद केले.

नथुसिंग बिहारीलालजी पुरोहित Nathusingh Biharilalji Purohit (वय ७० वर्षे, व्यवसाय – व्यावसायिक, रा. फ्लॅट क्र. २, अनूतेज सिम्फनी, नाना पेठ, पुणे – ४११००२), सतीश लक्ष्मणसिंग राजपुरोहित Satish Laxmansingh Rajpurohit (वय ६२ वर्षे, व्यवसाय – व्यावसायिक, रा. फ्लॅट क्र. ३०३, जैन मंदिराजवळ, स्टेशन रोड, सोमवार पेठ, पुणे – ४११०११), भगवानसिंग लक्ष्मणसिंग राजपुरोहित Bhagwansingh Laxmansingh Rajpurohit (वय ५२ वर्षे, व्यवसाय – व्यावसायिक, रा. ५५८, अपोलो थिएटरजवळ, रास्ता पेठ, पुणे – ४११०११) आणि प्रल्हादराम देवाराम चौधरी Prahaladram Devaram Chaudhary (वय ६१ वर्षे, व्यवसाय – व्यावसायिक, रा. घर क्र. ४, घोरपडे कॉम्प्लेक्स, सोमवार पेठ, पुणे – ४११०११) या चौघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

६१ वर्षीय अशोक मिलापचंद जैन यांचा मृतदेह आपटे रस्त्यावरील एका हॉटेलच्या खोलीत आढळून आला होता. त्यांच्या शरीरावर ओरखडे आणि इतर जखमांचे निशाण आढळले होते. तसेच, त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आरोपींनी आर्थिक फसवणूक केल्याचा उल्लेख केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी जैन यांच्या मुलाने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बांधकाम प्रकल्पाच्या व्यवहारातून आरोपींनी अशोक जैन यांचे सुमारे १५ कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना प्राथमिक वैद्यकीय अहवालात विषबाधा आणि शरीरावरील बोथट आघातांचा उल्लेख असल्याचे सांगितले. मृताच्या शरीरावर सुमारे १३ ते १४ जखमा आढळून आल्या असून, अंतिम शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने जामीन नाकारला. लिहिलेली चिठ्ठी हा या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असल्याचे निरीक्षण नोंदवत, कथित आर्थिक फसवणूक आणि मृत्यू यांचा थेट संबंध आहे का, तसेच आरोपींवर लावण्यात आलेले आरोप लागू होतात का, याचा अंतिम निर्णय सुनावणीदरम्यान घेतला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.